‘पंतप्रधान स्वतःला फकीर मानतात, पण हा सर्व उपद्व्याप फकिरीत बसत नाही’ संजय राऊतांचा पंतप्रधान मोदींना टोला

मेहुल चोक्सी आणि पश्चिम बंगालमधील राजकीय खेळांच्या माध्यमातून केंद्र सरकार केवळ वेळकाढूपणा करत असल्याचा आरोप संजय राऊत यांनी केला आहे. मेहुल चोक्सी हा भगोडा ऑण्टिग्वाच्या राजकारणाचा केंद्रबिंदू बनला आहे.

    मुंबई: ‘दिल्लीत कोरोना काळात नवे संसद भवन, पंतप्रधानांसाठी पंधरा एकरात नवे घर, नवे उपराष्ट्रपती निवास उभे राहत आहे. पंतप्रधान स्वतःला फकीर मानतात, पण हा सर्व उपद्व्याप फकिरीत बसत नसल्याचा’, सणसणीत टोला ‘सामाना’ च्या रोखठोक सदरातू शिवसेना खासदार संजय राऊतांनी (Sanjay Raut) पंतप्रधान नरेंद्र मोदींना (PM Modi ) लगावला आहे.

    मेहुल चोक्सी आणि पश्चिम बंगालमधील राजकीय खेळांच्या माध्यमातून केंद्र सरकार केवळ वेळकाढूपणा करत असल्याचा आरोप संजय राऊत यांनी केला आहे. मेहुल चोक्सी हा भगोडा ऑण्टिग्वाच्या राजकारणाचा केंद्रबिंदू बनला आहे. ऑण्टिग्वाचे पंतप्रधान गेस्टन ब्राऊन यांनी चोक्सीला भारताच्या हवाली केले तर नव्या सेंट्रल व्हिस्टा प्रकल्पात ब्राऊन यांचा पुतळा नक्कीच उभारला जाईल. २०२२च्या प्रजासत्ताक दिनाचे ते सन्माननीय पाहुणेही असतील, काय सांगावे! स्वातंत्र्यवीर सावरकरांच्या आधी मिस्टर ब्राऊन यांना ‘भारतरत्न’ही दिले जाईल, असा टोला संजय राऊत यांनी लगावला आहे.

    मीडियाचे कोरोनावरून लक्ष हटवण्यासाठी मेहुल चोक्सीला भारतात आणण्यासाठी प्रयत्न सुरु आहेत. चोक्सीला आपल्याकडे पाठवलाच तर मीडिया मेहुल चोक्सीच्या रोमांचकारी कथांच्या मागे लागेल व लोकांचा तेवढाच वेळ जाईल. गरीबांना काय जॉन्सनप्रमाणे तिसरे लग्न करता येत नाही व नवे घरही बांधता येत नाही. असेही राऊतांनी म्हटले आहे.