कोरोनाच्या  पार्श्वभूमीवर यांत्रिक पद्धतीने नालेसफाई करण्यास प्राधान्य

मुंबई : बृहन्मुंबई महापालिका क्षेत्रातील पावसाळापूर्व कामांनी आता वेग घेतला आहे. मिठी नदीतील साफसफाईसह मोठ्या व छोट्या नाल्यांची पावसाळापूर्व नालेसफाई वेगात सुरू झाली आहे. दरवर्षीप्रमाणेच एप्रिलच्या पहिल्या आठवड्यात नालेसफाईची बहुतांश कामे सुरू झाली आहेत.

 नालेसाफसफाईशी संबंधित सर्व मनुष्यबळास ‘सोशल डिस्टन्सींग’ सह ‘मास्क’ वापरण्याचे आणि ‘कोरोना’च्या अनुषंगाने आवश्यक ती सर्व काळजी काटेकोरपणे घेण्याचे निर्देश

 
मुंबई : बृहन्मुंबई महापालिका क्षेत्रातील पावसाळापूर्व कामांनी आता वेग घेतला आहे. मिठी नदीतील साफसफाईसह मोठ्या व छोट्या नाल्यांची पावसाळापूर्व नालेसफाई वेगात सुरू झाली आहे. दरवर्षीप्रमाणेच एप्रिलच्या पहिल्या आठवड्यात नालेसफाईची बहुतांश कामे सुरू झाली आहेत. यंदाच्या नालेसफाईचे वेगळेपण म्हणता येईल, ते म्हणजे ‘कोरोना कोविड १९’ च्या पार्श्वभूमीवर आवश्यक ती सर्व काळजी घेऊन ही कामे करण्यात येत आहेत. यामध्ये प्रामुख्याने यांत्रिक पद्धतीने नालेसफाई करण्यास प्राधान्य दिले जात असून त्यात मानवी हस्तक्षेप कमीत कमी असेल याकडे काटेकोरपणे लक्ष दिले जात आहे. त्याचबरोबर यापूर्वी देण्यात आलेल्या निर्देशांनुसार सर्व संबंधित व्यक्तींनी व कामाच्या ठिकाणी असणाऱ्या कामगार -कर्मचारी – अधिकाऱ्यांद्वारे ‘सोशल- डिस्टन्सींग’ काटेकोरपणे पाळण्यात असून मुखावरणे (मास्क) देखील नियमितपणे वापरण्यात येत आहेत.
तसेच कंत्राटदारांनीही त्यांच्या मनुष्यबळाकडून नालेसफाई विषयक कामे करवून घेताना, या बाबींचे काटेकोरपणे पालन करत असल्याची खातरजमा नियमितपणे व वेळोवेळी करून घ्यावी, असेही निर्देश यापूर्वीच देण्यात आले आहेत.
कोरोनाविरुद्ध लढा देत असतानाच महापालिका क्षेत्रातील इतर आवश्यक कामे देखील निर्धारित वेळापत्रकानुसार पूर्ण होतील याकडे महापालिका प्रशासन कटाक्षाने लक्ष देत आहे. 
कोरोनाच्या पार्श्वभूीवर पावसाळापूर्व कामे वेळेत पूर्ण होण्यास अनेक आव्हाने व अडचणी असताना देखील महापालिकेच्या स्तरावर सुव्यवस्थित नियोजन करून कामे वेळेत पूर्ण होतील, याकडे प्राधान्याने लक्ष दिले जात आहे.
मिठी नदी सह मोठ्या नाल्यांची साफसफाईची कामे ही प्रामुख्याने महापालिकेच्या पर्जन्य जलवाहिन्या खात्यामार्फत केली जात आहेत. तर  नाल्यांच्या सफाईचे नियोजन व व्यवस्थापन पालिकेच्या विभाग कार्यालयांच्या स्तरावर करण्यात येत आहे.
महापालिका क्षेत्रातील सुमारे २६४ किलोमीटर लांबीच्या २८० मोठ्या नाल्यांची साफसफाई केली जाणार आहे. यामध्ये शहर भागातील सुमारे २२ किलोमीटर लांबीचे २७ मोठे नाले, पूर्व उपनगरातील १०२ किलोमीटर लांबीचे १११ मोठे नाले, तर पश्चिम उपनगरातील १४० किलोमीटर लांबीचे १४२ मोठे नाले यांचा समावेश आहे.
 
एकूण कंत्राट कालावधीदरम्यान या साफसफाईद्वारे सुमारे ३ लाख ६२ हजार ६३८ मेट्रीक टन एवढ्या प्रमाणातील गाळ उपसला जाईल. यापैकी ३६ हजार ४२७ टन एवढा गाळ शहर भागातील मोठ्या नाल्यांमधून, पूर्व उपनगरांमधील मोठ्या नाल्यांमधून १ लाख २२ हजार ७७० टन; तर पश्चिम उपनगरांमधील मोठ्या नाल्यांमधून २ लाख ३ हजार ४४१ टन एवढा गाळ काढला जाईल असा अंदाज आहे. महापालिकेद्वारे करण्यात येणाऱ्या नालेसफाईच्या दरवर्षीच्या पद्धतीनुसार तसेच कंत्राटातील अटी व शर्तीनुसार सुमारे ७० टक्के गाळ हा पावसाळ्यापूर्वी, तर पावसाळ्या दरम्यान व त्यानंतर उर्वरित ३० टक्के गाळाचा उपसा केला जाणार आहे.
 
 महानगरपालिकेच्या तिन्ही भागातून वाहणाऱ्या व २१.५०५ किलोमीटर एवढी लांबी असणाऱ्या मिठी नदीच्या साफसफाईचे काम देखील आता सुरू झाले आहे. कंत्राट कालावधीदरम्यान मिठी नदीमधून सुमारे १ लाख ३८ हजार ८३० मेट्रीक टन एवढा गाळ उपसला जाणार असून यापैकी ७० टक्के गाळ हा पावसाळापूर्व साफसफाई दरम्यान काढला जाणार आहे.
वरील नुसार बृहन्मुंबई महानगरपालिका क्षेत्रात सुरू असलेली नालेसफाईची व मिठी नदी सफाईची कामे ही निर्धारित वेळापत्रकानुसार पूर्ण होतील असा विश्वास महापालिकेच्या पर्जन्य जलवाहिन्या खात्याद्वारे व्यक्त करण्यात आला आहे.