फास्टॅगचा उलटा परिणाम, टोलनाक्यावर अधिकच गर्दी, तांत्रिक अडचणींमुळे मूळ हेतूवरच विरजण

फास्टॅग गाड्यांवर असूनही ते अनेक ठिकाणी स्कॅन होत नाहीत. त्यामुळे अशा वाहनांना बाजूला घेऊन त्यांच्याकडून दंडवसुली करण्याचे प्रकार सध्या पुणे आणि मुंबईतील प्रवेशांच्या टोलनाक्यांवर घडत आहेत. यात वाहनचालक आणि टोलनाका कर्मचारी यांच्यात चांगलीच भांडणे होत असल्याचे दिसत आहे. फास्टॅग लावला असताना पैसे का भरायचे, असा सवाल प्रवासी करतात, तर फास्टॅग स्कॅन होत नसल्याचे हिशोबात गडबड होऊ शकत असल्याची भीती टोलनाका कर्मचाऱ्यांना भेडसावते आहे. 

    वाहतूक कोंडी कमी व्हावी, टोलनाक्यावर जाणारा प्रवाशांचा वेळ वाचावा आणि वाहतूक अधिक जलद व्हावी हा फास्टॅगच्या संकल्पनेमागचा खरा हेतू. मात्र सध्या पुणे आणि मुंबईतील टोलनाक्यांवर जे काही घडतंय, ते पाहून आधीचाच प्रकार बरा होता, असं म्हणण्याची वेळ वाहनचालकांवर आली आहे.

    फास्टॅग गाड्यांवर असूनही ते अनेक ठिकाणी स्कॅन होत नाहीत. त्यामुळे अशा वाहनांना बाजूला घेऊन त्यांच्याकडून दंडवसुली करण्याचे प्रकार सध्या पुणे आणि मुंबईतील प्रवेशांच्या टोलनाक्यांवर घडत आहेत. यात वाहनचालक आणि टोलनाका कर्मचारी यांच्यात चांगलीच भांडणे होत असल्याचे दिसत आहे. फास्टॅग लावला असताना पैसे का भरायचे, असा सवाल प्रवासी करतात, तर फास्टॅग स्कॅन होत नसल्याचे हिशोबात गडबड होऊ शकत असल्याची भीती टोलनाका कर्मचाऱ्यांना भेडसावते आहे.

    काही प्रवाशांना तर फास्टॅगचे पैसेही कट होतात आणि तो स्कॅन होत नसल्यामुळे वेगळा टोल भरावा लागत असल्याचे अनुभव येत आहेत. महाराष्ट्रातील प्रसिद्ध कवी संदीप खरे यांनादेखील अशाच मनस्तापाचा सामना करावा लागल्याचं त्यांनी म्हटलंय. मात्र फास्टॅग असल्यामुळे दंड भरण्याचा प्रश्नच येत नाही, अशी ठाम भूमिका त्यांनी घेतली. कर्मचाऱ्यांना नीट प्रशिक्षण दिलं नसल्याचंही आढळून येतंय. फास्टॅग स्कॅन करणे आणि त्याची नोंद ठेवण्याचे नीट प्रशिक्षण झाले नसल्यामुळे कर्मचारी आणि प्रवासी यांच्यात बाचाबाची होत आहे.

    टोलनाक्यावर थांबावे लागू नये आणि वाहतुकीचा वेग वाढावा, हा मूळ हेतूच त्यामुळे बाजूला पडलाय. आता पूर्वीपेक्षा अधिक वेळ टोलनाक्यावर जात असल्याने आधीचाच टोल भरण्याचा प्रकार बरा होता, अशी भावना अनेक प्रवासी व्यक्त करताना दिसत आहेत. प्रशासनाने याकडे लक्ष देऊन त्यातील तांत्रिक अडचणींवर लवकरात लवकर तोडगा काढणे गरजेचे आहे.