विधिमंडळाच्या पायऱ्यांवर प्रतिविधानसभेला मज्जाव; माध्यमांचे वार्तांकन रोखल्याने अभूतपूर्व आणिबाणीसदृश्य स्थिती!

मार्शलच्या कारवाईनंतर विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी तीव्र संताप व्यक्त करत ही सरकारची दडपशाही खपवून घेणार नाही आमच्यावर बंदी घालत सरकारने माध्यमांवर बंदी घालणे ही लोकशाहीची गळचेपी आहे. आणीबाणी असल्याचा आरोप केला.

    मुंबई: विधिमंडळाच्या बाहेरच्या परिसरात आज अभूतपूर्व राजकीय आणिबाणीची स्थिती आणि आंदोलन पहायला मिळाले. या आंदोलनाचा तडाखा वृत्तांकन करणाऱ्या पत्रकार आणि वृत्तवाहिन्यांच्या कँमेरामन यांनाही बसला आहे. काल तालिका अध्यक्ष भास्कर जाधव यांनी भाजपच्या १२ सदस्याना निलंबित केल्याने आक्रमक झालेल्या विरोधकांनी प्रत्यक्ष कामकाजात भाग न घेता विधान भवनाच्या पाय-यांवर प्रतिविधानसभा भरवून सरकारचा निषेध नोंदवला. त्यावेळी विधानसभा  तालिका अध्यक्षांनी त्यांना माईक वरून पायऱ्यांवर प्रति विधानसभा भरविण्यास मज्जाव केला तसेच माध्यमांनाही हे वार्तांकन करण्यास रोखण्यात आले त्यावेळी अभूतपूर्व स्थिती निर्माण झाली.

    पायरीवरच अभिरुप विधानसभा
    काल भाजपच्या १२ सदस्यांना निलंबीत केल्यांनतर विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी विधानसभेच्या कामकाजावर बहिष्कार टाकत थेट विधानसभेच्या पायरीवरच अभिरुप विधानसभा भरवत सरकारच्या निषेधाचा प्रस्ताव मांडला आणि त्यावर चर्चा सुरू केली. भाजप आणि मित्रपक्षाचे सर्वच आमदार विधानसभेच्या पायरीवर बसले. चंद्रकांत पाटील, देवेंद्र फडणवीस, प्रवीण दरेकर, सुधीर मुनगंटीवार आणि राधाकृष्ण विखे-पाटील यांनी यावेळी भाषणे केली. ज्येष्ठ आमदार कालिदास कोळंबकर यांना अभिरुपी विधानसभाचे अध्यक्ष करण्यात आले होते. यावेळी बोलताना देवेंद्र फडणवीस यांनी काल झालेला प्रकार या अभिरुप विधानसभेच्या अध्यक्षांच्या लक्षात आणून दिला. तसेच सरकारच्या निषेधाचा आणि धिक्काराचा प्रस्ताव मांडला. हे सरकार जुल्मी सरकार आहे. वसुली सरकार आहे. हे भ्रष्टाचारी सरकार आहे. त्याचा आम्हाला पर्दाफाश करायचा आहे, असे फडणवीस म्हणाले. तसेच या अभिरुप विधानसभेत काही सदस्य बोलणार असून त्यांना बोलण्याची संधी द्यावी, अशी मागणी त्यांनी केली.

    माईक काढल्याने गोंधळ
    त्यावेळी या सदस्यांना सदनाबाहेर अश्याप्रकारे माईकवर भाषणाची परवानगी तसेच माध्यमांना वार्ताकनाची परवानगी कुणी दिली आहे का असा सवाल करत भास्कर जाधव यांनी  आक्षेप घेतला. त्यानंतर त्यांनीच काही वेळाने तालिका अध्यक्ष म्हणून वार्ताकन थांबविण्याचे तसचे माईक काढून घेण्याचे आदेश दिले. त्यानंतर मार्शलनी प्रतिविधानसभेच्या ठिकाणी पोहोचून माईक काढून घेण्याचा प्रयत्न केला. त्यावेळी भाजप आमदारांनी घोषणाबाजी करत सरकारच्या कारवाईचा निषेध केला. त्यावेळी गोंधळ आणि तणावाची स्थिती निर्माण झाली. मार्शलच्या कारवाईनंतर विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी तीव्र संताप व्यक्त करत ही सरकारची दडपशाही खपवून घेणार नाही आमच्यावर बंदी घालत सरकारने माध्यमांवर बंदी घालणे ही लोकशाहीची गळचेपी आहे. आणीबाणी असल्याचा आरोप केला. ते म्हणाले की, माईक काढला तरी आमचा आवाज बंद केला जाऊ शकत नाही. सरकारच्या विरोधात आम्ही बोलतच राहणार. माध्यमांवर मार्शलकरवी मुस्काटदाबी करण्यात आली आहे. ही आणीबाणी आहे, असे फडणवीस म्हणाले. ते म्हणाले की, या सरकारला आमचा डीएनए माहीत नाही. इंदिरा गांधींनीही आणीबाणी लादून आमचा आवाज दाबण्याचा प्रयत्न केला होता. पण त्याही आमचा आवाज दाबू शकल्या नाहीत, विधानसभेच्या पायरीवर बसू दिले जात नसेल तर आम्ही प्रेस रुममध्ये जाऊन प्रतिविधानसभा भरवू असा इशारा फडणवीसांनी दिला. त्यानंतर विरोधी पक्षाने विधानसभेच्याच पायरीवर माईकशिवाय प्रतिविधानसभा भरवण्यात आली. यावेळी भाजप सदस्यांनी सरकार विरोधात भाषणे सुरूच ठेवली होती.