Projects implemented in five hospitals; BMC's move towards self-sufficiency

पालिकेचे कस्तुरबा रुग्णालय, वांद्रे येथील भाभा रुग्णालय, घाटकोपरचे राजावाडी रुग्णालय, विलेपार्ले येथील डॉ. कूपर रुग्णालय आणि वरळीतील नेहरु विज्ञान केंद्र येथील कोविड आरोग्य केंद्र या पाच ठिकाणी पालिकेच्या वतीने आॅक्सिजनचे उत्पादन करणारे प्रकल्प उभारण्यात आले आहेत. त्यातून दररोज एकूण ६.९३ मेट्रिक टन प्राणवायू उत्पादीत होणार आहे.

    मुंबई : ऑक्सिजनचे उत्पादन प्रकल्प उभारुन स्वयंपूर्णतेकडे मुंबई महानगर पालिकेची होत असलेली वाटचाल ही अभिमानास्पद आहे, असे गाैरवपूर्ण उद्गार राज्याचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी काढले. त्यांच्या हस्ते आज कॉर्पोरेट सामाजिक उत्तरदायित्वातून पाच रुग्णालयांमध्ये उभारलेल्या आणि सात मेट्रीक टन ऑक्सिजनचे दरराेज उत्पादन करणार्या प्रकल्पांचे उद्घाटन झाले.

    पालिकेचे कस्तुरबा रुग्णालय, वांद्रे येथील भाभा रुग्णालय, घाटकोपरचे राजावाडी रुग्णालय, विलेपार्ले येथील डॉ. कूपर रुग्णालय आणि वरळीतील नेहरु विज्ञान केंद्र येथील कोविड आरोग्य केंद्र या पाच ठिकाणी पालिकेच्या वतीने आॅक्सिजनचे उत्पादन करणारे प्रकल्प उभारण्यात आले आहेत. त्यातून दररोज एकूण ६.९३ मेट्रिक टन प्राणवायू उत्पादीत होणार आहे. या प्रकल्पाच्या उद्घाटन प्रसंगी मुख्यमंत्री बोलत होते. या ऑनलाईन उद्घाटन समारंभास पर्यावरण मंत्री आदित्य ठाकरे, महापौर किशोरी पेडणेकर, पालिका आयुक्त इकबाल सिंह चहल, अतिरिक्त पालिका आयुक्त (प्रकल्प) पी. वेलरासू, आदी उपस्थित हाेते.

    मुख्यमंत्री ठाकरे पुढे म्हणाले की, पालिकेने कोविड व्यवस्थापनात केलेल्या कामगिरीचे ‘धारावी मॉडेल’ जसे जगभरात नावाजले गेले, त्याचप्रमाणे प्राणवायू व्यवस्थापनाचे ‘मुंबई मॉडेल’ देखील संपूर्ण जगभरामध्ये कौतुकास पात्र ठरले आहे. आता वैद्यकीय प्राणवायूचे महत्त्व लक्षात घेता त्याबाबतीत मुबई महापालिका स्वयंपूर्णतेकडे वाटचाल करीत आहे, ही अभिमानास्पद बाब आहे, स्वतःचा जीव धोक्यात घालून नागरिकांचे जीव वाचविण्यास प्राधान्य देणारे डॉक्टर्स, नर्सेस हे देवदुतांपेक्षा कमी नाहीत, असे कौतुकही ठाकरे यांनी केले.

    वातावरणातील हवा शोषून त्याद्वारे वैद्यकीय प्राणवायूची निर्मिती करणाऱया (पीएसए) तंत्रज्ञानाचा उपयोग करुन या पाच रुग्णालयात हे प्रकल्प उभारण्यात आले आहेत. कॉर्पोरेट सामाजिक उत्तरदायित्व (सीएसआर) माध्यमातून सर्व संयंत्र उपलब्ध झाले आहेत. त्यासाठी मेसर्स आरती इंडस्ट्रीज, मेसर्स घारडा केमिकल्स, मेसर्स बी. जी. शिर्के कन्स्ट्रक्शन टेक्नॉलॉजी प्रा. लिमिटेड, मेसर्स सारेक्स फाऊंडेशन, मेसर्स अल्ट्राटेक सिमेंट लिमिटेड, मेसर्स डी डेकोर होम फॅब्रिक्ज प्रा. लि. आणि मेसर्स मारवाह स्टील प्रा. लिमिटेड या सात दात्यांनी मिळून सीएसआर अंतर्गत हे संयंत्र उभारण्यासाठी महानगरपालिकेला सहकार्य केले आहे. पालकमंत्री आदित्य ठाकरे यांच्या विशेष प्रयत्नांतून या सात दात्यांनी संयंत्र महानगरपालिकेला तातडीने उपलब्ध करुन दिले आहेत.