कोरोनाबाधित प्राध्यापकांना आर्थिक मदत करा; अखिल भारतीय राष्ट्रीय शैक्षणिक महासंघाची मागणी

कोरोनाने जगभर थैमान घातले असल्याने महाविद्यालयांची बहुतांश कामे घरातूनच सुरू आहेत. मात्र, काही ठिकाणी नियम डावलून प्राध्यापकांना महाविद्यालयात बोलावले जाते. यामुळे अनेकांना कोरोनाची लागण होऊन मृत्यू देखील झाला आहे. यामुळे कोरोना झालेल्या आणि कोरोनामुळे मृत्यू पावलेल्या प्राध्यापकांना विद्यापीठाने आर्थिक मदत करावी अशी मागणी अखिल भारतीय राष्ट्रीय शैक्षणिक महासंघाचे महासचिव सुभाष आठवले यांनी केली आहे.

    मुंबई : कोरोनाने जगभर थैमान घातले असल्याने महाविद्यालयांची बहुतांश कामे घरातूनच सुरू आहेत. मात्र, काही ठिकाणी नियम डावलून प्राध्यापकांना महाविद्यालयात बोलावले जाते. यामुळे अनेकांना कोरोनाची लागण होऊन मृत्यू देखील झाला आहे. यामुळे कोरोना झालेल्या आणि कोरोनामुळे मृत्यू पावलेल्या प्राध्यापकांना विद्यापीठाने आर्थिक मदत करावी अशी मागणी अखिल भारतीय राष्ट्रीय शैक्षणिक महासंघाचे महासचिव सुभाष आठवले यांनी केली आहे.

    गतवर्षी कोरोनाचा प्रादुर्भाव सुरू झाल्यापासून अनेक विनाअनुदानित महाविद्यालयांमधील प्राध्यापकांचे वेतन वेळेवर होत नाही. ही बाब वारंवार विद्यापीठाच्या निदर्शनास आणूनही त्यावर ठोस कारवाई करण्यात आलेली नाही. याच काळात अनेक शिक्षक-शिक्षकेतर कर्मचार्‍यांना कोविड आजाराने ग्रासले. एकीकडे वेतन नाही आणि दुसरीकडे आजाराच्या उपचारासाठी पैसे नाहीत अशा अवस्थेत शिक्षक वर्ग सापडला. त्यात काहींचा जीव देखील गेला.

    राजीव गांधी अभियांत्रिकी महाविदयालय आणि पिल्लई अभियांत्रिकी महाविद्यालयातील प्राचार्‍यांचा कोरोनामुळे मृत्यू झाला आहे. व्यतिरिक्त बर्‍याच शिक्षक वर्गाला कोविडच्या आजाराचा त्रास सहन करावा लागत असल्याचे आठवले यांनी आपल्या निवेदनात म्हटले आहे.

    चक्रीवादळामुळे नुकसान झालेल्या महाविद्यालयांना विद्यापीठाकडून होत असलेली मदत स्वागतार्ह आहे. परंतु कोरोनाच्या महामारीत मृत्यूमुखी पडणार्‍या शिक्षक व शिक्षकेतर कर्मचार्‍यांच्या कुटुंबियांचा सकारात्मकपणे विचार होणे गरजेचे आहे. मात्र, मुंबई विद्यापीठ प्रशासनाकडून याकडे दुर्लक्ष करण्यात येत असल्याने प्राध्यापक वर्गांमध्ये विद्यापीठाविषयी प्रचंड नाराजीचे वातावरण निर्माण झाले आहे. त्यामुळे विद्यापीठांनी लवकरात लवकर विना अनुदानित महाविद्यालयातील प्राध्यापकांना आर्थिक मदत जाहीर करावी अन्यथा प्राध्यापकाच्या रोषाला सामोरे जावे लागेल असा इशारा सुभाष आठवले यांनी दिला.