केंद्रात सहकार खात्याची नव्याने निर्मिती केल्याबद्दल केंद्र सरकारचे जाहीर आभार : आ. सदाभाऊ खोत

काही महत्त्वाकांक्षी लोकांनी सहकार चळवळ ही राजकारणाची बटिक बनवली आहे व त्यामुळे सामान्य माणूस सहकारापासून दूर फेकला गेला आहे. केंद्र सरकारच्या या निर्णयामुळे अनेक सहकारी संस्था नव्याने उदयाला येतील व लाखो तरुणांना त्या माध्यमातून रोजगार निर्मिती होईल अशी अपेक्षा व्यक्त करतो.

  मुंबई : राज्याचे माजी कृषी राज्यमंत्री सदाभाऊ खोत यानी केंद्रात सहकार खात्याची नव्याने निर्मिती केल्याबद्दल केंद्र सरकारचे आणि देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे जाहिर आभार व अभिनंदन व्यक्त केले आहेत. याबाबत एका चित्रफितीव्दारे खोत यानी म्हटले आहे की, नव्यानेच देशाच्या पातळीवर सहकार खात्याची केंद्र सरकार निर्मिती करत आहे. सहकाराच्या माध्यमातून ग्रामीण भागामध्ये उद्योगाला चालना मिळाली. सर्वसामान्य जनतेच्या सहभागातून अनेक सहकारी संस्था उदयाला आल्या.

  सहकार चळवळ राजकारणाची बटिक

  परंतु काही महत्त्वाकांक्षी लोकांनी सहकार चळवळ ही राजकारणाची बटिक बनवली आहे व त्यामुळे सामान्य माणूस सहकारापासून दूर फेकला गेला आहे. केंद्र सरकारच्या या निर्णयामुळे अनेक सहकारी संस्था नव्याने उदयाला येतील व लाखो तरुणांना त्या माध्यमातून रोजगार निर्मिती होईल अशी अपेक्षा व्यक्त करतो.

  ग्रामीण भागाला नवी उभारी मिळेल

  त्यांनी म्हटले आहे की, या खात्याच्या माध्यमातुन विविध राज्यांमध्ये सहकार वाढण्यासाठी निश्चितच उपयोग होईल. आता केद्रांने  गाव पातळीवरच्या सहकारी संस्थाचा संबंध थेट केंद्र सरकारच्या सहकार खात्याशी ठेवत नव्याने प्रवास सुरू करावा. राज्य सरकारच्या माध्यमातून या सहकार खात्याचा कारभार चालवु नये तथापि यावर केंद्रशासनाचे नियंत्रण असावे. तरच ग्रामीण भागात सहकाराचे जाळे नव्याने उभे राहील.

  रयत क्रांती संघटनेकडुन आभार

  परंतु राज्य सरकारच्या माध्यमातूनच जर योजना राबवल्या गेल्या तर पूर्वीच्याच सहकार सम्राटांच्या हातात सहकार खात्याची संपूर्ण सूत्र जातील.  भविष्यात केंद्र सरकारच्या या नव्या सहकार खात्याच्या माध्यमातुन ग्रामीण भागाला एक नवी उभारी मिळेल, हिच अपेक्षा. पुनःश रयत क्रांती संघटनेकडुन या केंद्र शासनाच्या निर्णायाचे जाहीर आभार..