मग त्यावेळी ते काय करत होते? देवेंद्र फडणवीस यांना छगन भुजबळांचा सवाल

मुंबई : निर्णय घेताना केंद्र सरकारने राज्य सरकारचे मत घ्यायला पाहिजे होते, अशा शब्दात अन्न नागरी पुरवठा मंत्री छगन भुजबळ यांनी केंद्र सरकारवर निशाणा साधला. मोठे उद्योगपती हे शेतमालाचे भाव पाडतील आणि विकत घेतील. यामुळे शेतकर्‍यांना हमीभाव मिळणार नाही अशी प्रतिक्रिया त्यांनी दिली. दिल्लीत सुरु असलेले शेतकरी आंदोलन आणि शेतकर्‍यांनी दिलेल्या भारत बंदच्या हाकेच्या पार्श्वभुमीवर ते बोलत होते.

पंजाबमधील शेतकरी हे फक्त भारताला नाही तर अनेक देशांना अन्नधान्य पुरवतात. हे शेतकरी गेले तीन महिने आंदोलन करत आहेत. आता ते दिल्लीच्या वेशीवर ठाण मांडून आहेत. खरोखर काही दुखणं असेल म्हणून हे शेतकरी आंदोलन करत आहेत. याला देशातील सर्व शेतकरी संघटनांनी पाठींबा दिलाय असेही भुजबळ म्हणाले. शेतकर्‍यांना दुखवणे हे घातक असल्याचे ते म्हणाले.

शेतकरी कायदा हा राष्ट्रवादी ने आणला असे फडणवीस म्हणतात. मग त्यावेळी ते काय काय करत होते? त्यावेळी का बोलले नाहीत? असा प्रश्न उपस्थित करत जे नाही ते उकरून काढायचे, असा टोला त्यांनी लगावला. पहिल्यापासून शेतकरी हिताचे अनेक निर्णय पवारांनी घेतल्याचे भुजबळ म्हणाले.