mumbai gutkha selling criminals

बंदी असतानाही मुंबईत मोठ्या प्रमाणात गुटखा, पान मसाल्याची विक्री होत असल्याचे वारंवार समोर आले. हा गुटखा रेल्वेने मुंबईत येत असल्याची माहिती प्राप्त झाल्याने मुंबई लोहमार्ग पोलीस आयुक्त कैसर खालिद यांनी कारवाईचे आदेश दिले.

    मुंबई: गुजरात(Gujrat) राज्यातून मुंबईत(Mumbai) होत असलेल्या गुटखा तस्करीचा(Gutkha Racket) मंगळवारी पहाटे पर्दाफाश करण्यात आला.ही कारवाई लोहमार्ग पोलीस दलाच्या गुन्हे प्रकटीकरण पथकाने केली. या कारवाईत गुटखा, पान मसाला व टेम्पो असा एकूण १० लाख २४८ रुपयांचा मुद्देमाल जप्त(Gutkha Seized) करण्यात आला आहे. गुटखा तस्करीचे मोठे रॅकेट उजेडात येण्याची शक्यता तपास पथकाने वर्तवली आहे.

    बंदी असतानाही मुंबईत मोठ्या प्रमाणात गुटखा, पान मसाल्याची विक्री होत असल्याचे वारंवार समोर आले. हा गुटखा रेल्वेने मुंबईत येत असल्याची माहिती प्राप्त झाल्याने मुंबई लोहमार्ग पोलीस आयुक्त कैसर खालिद यांनी कारवाईचे आदेश दिले. त्यानुसार लोहमार्ग गुन्हे प्रकटीकरण पथक लांब पल्ल्यांच्या मेल, एक्सप्रेसमधून प्रवास करणाऱ्यांवर लक्ष ठेवून असताना सौराष्ट्र एक्सप्रेसमधून मोठ्या गुटखा आणला जाणार असल्याचे खबऱ्याने सांगितले.

    त्यानुसार लोहमार्ग गुन्हे प्रकटीकरण पथकाने मुंबई सेंट्रल स्थानकात सापळा लावला. फलाट क्रमांक ५ वर आलेल्या सौराष्ट्र एक्सप्रेसच्या माल डब्यातून उतरवण्यात आलेल्या गोण्या फलाटाच्या गेटजवळ उभ्या असलेल्या टेम्पोत चढवताना एका व्यक्तीला लोहमार्ग पोलिसांनी ताब्यात घेतले.

    गोण्यांची झडती घेतली असता त्यात ५ लाख २४८ रुपयांचा विमल पान मसाला, जाफरी पान मसाला, जीकेबी तंबाखूजन्य पदार्थ आढळून आले. लोहमार्ग पोलिसांनी त्या इसमाची चौकशी केली असता त्या इसमाचे नाव ग्रिजेश तिवारी (३१, रा. धारावी, मुंबई) असल्याचे समजले. गुजरात राज्यातून महाराष्ट्र गुटखा तस्करी करत असल्या प्रकरणी मुंबई सेंट्रल लोहमार्ग पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करून ग्रिजेश तिवारी याला अटक करण्यात आली.

    ही कारवाई लोहमार्ग पोलीस आयुक्त कैसर खालिद, मध्य लोहमार्गचे उपायुक्त एम. एम. मकानदार, लोहमार्ग गुन्हे प्रकटीकरणचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक गजेंद्र पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली विशेष कृती दलाचे सहाय्यक पोलीस निरीक्षक हेमराज साठे, पोलीस उपनिरीक्षक दीपक शिंदे इत्यादींनी केली.