लोकल सुरु करण्यासाठी रेल्वेची पूर्ण तयारी आहे पण… रेल्वे प्रशासनाने सरकार समोर मांडली मोठी अडचण

सर्वांसाठी रेल्वे सुरू झाल्यास गर्दी मोठ्या प्रमाणात वाढेल. त्याला आवर घालणे सोपे नाही. सोशल डिस्टन्सिंग पाळले जाणार नाही. एकीकडे कोरोनाच्या पार्श्वभूमीवर गर्दी होऊ नये म्हणून संचारबंदी करण्यात आली, मात्र सर्वांसाठी रेल्वे सुरू केल्यास गर्दीतून कोरोनाचा अधिक प्रसार होऊ शकतो त्याचाही विचार व्हावा, असे रेल्वेचे म्हणणे आहे.

मुंबई : मागील अनेक महिन्यांपासून मुंबईची लाईफलाईन असलेली लोकल सेवा बंद आहे. अनलॉक अंतर्गत टप्प्याटप्प्याने कर्मचारी तसेच महिलांना लोकलमध्ये प्रवेश देण्यात आला. मात्र, लोकल सर्वसामान्यांसाठी अद्याप सुरु झालेली नाही. मंगळवारी रेल्वे सुरू करण्याबाबत निर्णय घेतला जाणार आहे.

कोरोनाच्या पार्श्वभूमीवर लोकांची गर्दी पाहता लोकल सेवा बंद करण्याचा निर्णय सरकारने घेतला होता. अत्यावश्यक सेवा वगळता इतर कर्मचाऱ्यांना लोकल बंद आहेत. यामुळे लोकल सुरु करण्याची मागणी होत आहे.

नियमित रेल्वे फेऱ्यांच्या तुलनेत आता उपनगरीय रेल्वेच्या ९० टक्के फेऱ्या होत आहेत. १० टक्के फेऱ्या वाढविण्यास रेल्वेला वेळ लागणार नाही. रेल्वेची यासाठी पूर्ण तयारी आहे. सरकारच्या प्रस्तावाला रेल्वे बोर्डाने मंजुरी दिल्यानंतर मध्य आणि पश्चिम रेल्वे मार्गावरून लोकल सुरू होतील.

मात्र, प्रश्न गर्दीचा आहे. सर्वांसाठी रेल्वे सुरू झाल्यास गर्दी मोठ्या प्रमाणात वाढेल. त्याला आवर घालणे सोपे नाही. सोशल डिस्टन्सिंग पाळले जाणार नाही. एकीकडे कोरोनाच्या पार्श्वभूमीवर गर्दी होऊ नये म्हणून संचारबंदी करण्यात आली, मात्र सर्वांसाठी रेल्वे सुरू केल्यास गर्दीतून कोरोनाचा अधिक प्रसार होऊ शकतो त्याचाही विचार व्हावा, असे रेल्वेचे म्हणणे आहे.

सर्व रेल्वे सुरू करण्याबाबत राज्य सरकारने अद्याप प्रस्ताव दिलेला नाही. राज्य सरकारचा प्रस्ताव आल्यानंतर तो रेल्वे बोर्डाच्या अध्यक्षांना पाठविला जाईल, ते गृहमंत्रालयाला पाठवतील. त्यानंतर पुढील आदेश येतील तेव्हा लोकल सुरू करु असे रेल्वेच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांनी सांगीतले.