बनावट ओळखपत्र व अनाधिकृतपणे प्रवास करणाऱ्या प्रवाश्यांकडून रेल्वे आतापर्यंत वसूल केली तीन कोटीहून अधिक दंडाची रक्कम

१ एप्रिल ते ३१ मेपर्यंत अवैध पद्धतीनं प्रवास करणाऱ्या एकूण ७५ हजार ७९३ प्रवाशांवर कारवाई करण्यात आली आहे. यात रेल्वेनं एकूण ३ कोटी ९७ लाख रुपये दंडात्मक स्वरुपात वसुल केले आहेत. १४ एप्रिलपासूनच लोकलमधून सामान्य नागरिकांच्या प्रवासाला बंदी घालण्यात आली आहे.

    मुंबई: कोरोनाच्या दुसऱ्या लाटेचा मोठा फटका राज्याला बसला आहे. संसर्गाचा आकडा कमी करण्यासाठीराज्यात लॉकडाऊन जाहीर करण्यात आले आहे. काम व्यतिरिक्त बाहेर फिरवण्यावर बंदी आणली आहे. मात्र तरी अनेक प्रवाशी विनाकारण बाहेर फिरताना दिसत आहेत. कोरोनाच्या हॉस्पॉट असलेल्या मुंबईमध्ये लोकल प्रवासासाठी फक्त अत्यावश्यक सेवेतील कर्मचाऱ्यांनाच परवानगी देण्यात आली आहे. मात्र काही सर्व सामान्य नागरिकही बनावट ओळखपत्राच्या आधारे तसंच विना तिकीट प्रवास करताना दिसत आहेत.

    मुंबईच्या मध्य रेल्वे विभागाने गेल्या ६० दिवसांमध्ये अशाप्रकारे अनिधिकृत प्रवास करणाऱ्या एकूण ७५ हजार लोकांवर कारवाई केली आहे. यात रेल्वेला दंडाच्या स्वरुपात कोट्यवधी रुपयांची मिळकत देखील प्राप्त झाली आहे. मध्य रेल्वेचे मुख्य जनसंपर्क अधिकारी शिवाजी सुतार यांनी दिलेल्या माहितीनुसार, १ एप्रिल ते ३१ मेपर्यंत अवैध पद्धतीनं प्रवास करणाऱ्या एकूण ७५ हजार ७९३ प्रवाशांवर कारवाई करण्यात आली आहे. यात रेल्वेनं एकूण ३ कोटी ९७ लाख रुपये दंडात्मक स्वरुपात वसुल केले आहेत. १४ एप्रिलपासूनच लोकलमधून सामान्य नागरिकांच्या प्रवासाला बंदी घालण्यात आली आहे. केवळ अत्यावश्यक सेवांशी निगडीत असलेल्या कर्मचारी वर्गालाच लोकल सेवेचा वापर करण्यास परवागनी आहे.

    याबरोबरच रेल्वेनं १७ एप्रिल ते २१ मे या कालावधीत मास्क न वापरणाऱ्या १ हजार ६१ प्रवाशांवर कारवाई केली आहे. रेल्वेनं जाहीर केलेल्या आकडेवारीनुसार आतापर्यंत रेल्वे प्रशासनानं खोटी ओळखपत्र तयार करुन प्रवास करत असलेल्या ८०८ प्रवाशांवर कारवाई केली आहे. अशा प्रवाशांकडून प्रत्येकी ५०० रुपयांचा दंड देखील वसुल करण्यात आला आहे.