११ धोकादायक पुलांची कामे रेल्वे करणार ; कामासाठी पालिका करणार खर्च

मुंबई : रेल्वे हद्दीतील पुलांचे काम विविध परवानग्या घेण्यात वेळ जात असल्याने प्रत्यक्ष कामाला विलंब होतो. त्यामुळे आता रेल्वे हद्दीतील ११ धोकादाय़क पुलांचे काम महाराष्ट्र व रेल्वे प्रशासन कंत्राटदारांच्या माध्यमातून केले जाणार आहे. यासाठी लागणारा खर्च पालिका करणार आहे.

पुलांच्या कामांसाठी कोट्यवधी रुपये खर्च करूनही त्यासाठी आवश्यक परवानग्यांसाठी वेळ वाया जातो. त्यामुळे आता महाराष्ट्र व रेल्वे प्रशासनाच्या कंत्राटदाराच्या माध्यमातून ११ धोकादायक पुलांचे काम करुन घेण्याचा निर्णय पालिकेच्या पूल विभागाने घेतला आहे. मार्च २०२१ पासून रेल्वे हद्दीतील ११ पुलांची कामे रेल्वे प्रशासनाच्या कंत्राटदाराच्या माध्यमातून करण्यात येणार आहेत. काम सुरु केल्यापासून तीन वर्षांत काम पूर्ण करणे कंत्राटदाराला बंधनकारक असणार आहे.

रेल्वे हद्दीतील पुलांची कामे सुरु करण्याआधी मुंबई रेल्वे सुरक्षा आयुक्तांची परवानगी मिळवणे, रेल्वे प्रशासनाला पैसे मोजणे अशा प्रकारच्या कार्यवाहीसाठी पालिकेला सामोरे जावे लागते. अनेक वेळा पैसे देऊनही परवानग्यासाठी विविध अधिकाऱ्यांसमोर फाईल फिरवावी लागते. यात वर्ष -दोन वर्षांचा कालावधी वाया जातो. त्यामुळे यापुढे रेल्वे हद्दीतील पुलांची कामे महाराष्ट्र सरकार व रेल्वे प्रशासनाच्या कंत्राटदाराच्या माध्यमातून करण्यात येणार आहेत. कंत्राटदार रेल्वे प्रशासनाचा असेल. मात्र पूल नव्याने बांधणे, दुरुस्ती करणे या सगळ्याचा खर्च पालिकाच करणार असल्याचे पूल अभियंता राजेंद्रकुमार तळकर यांनी सांगितले.

या पुलांची कामे होणार –
रे रोड, दादर टिळक पूल, घाटकोपर, मुंबई सेंट्रल, भायखळा, माझगाव, करीरोड, आर्थर रोड, लोअर परळ, माटुंगा पूल