अजून आठवडाभर पावसाची महाराष्ट्राकडे पाठ; वाढत्या आर्द्रतेने मुंबईकरांना फुटणार घाम

मान्सूनच्या हजेरीआधी हवामान खात्याने यंदाच्या वर्षात पावसाची समाधानकारक हजेरी लागेल, असा अंदाज वर्तवला होता. त्यामुळे मुंबईकरांबरोबरच उर्वरित महाराष्ट्राच्या ग्रामीण भागातील बळीराजा सुखावला होता. मात्र काही दिवस जोरदार हजेरी लावल्यानंतर पावसाने महाराष्ट्राकडे पाठ फिरवली आहे.

    मुंबई : जूनच्या सुरुवातीला धडाकेबाज हजेरी लावणारा पाऊस अचानक कुठे गायब झाला, असा प्रश्न मुंबईकरांना पडला आहे. जुलैमध्ये धो-धो बरसातीची अपेक्षा बाळगणारे मुंबईकर सध्या घामाच्या धारांनी भिजू लागले आहेत. हवेतील आर्द्रतेचे प्रमाण वाढल्यामुळे शहरात उकाडा वाढला आहे. अजून किमान आठवडाभर मुंबईसह उर्वरित महाराष्ट्राकडे पावसाची पाठ असेल, असा अंदाज हवामान खात्याने वर्तवला आहे.

    मान्सूनच्या हजेरीआधी हवामान खात्याने यंदाच्या वर्षात पावसाची समाधानकारक हजेरी लागेल, असा अंदाज वर्तवला होता. त्यामुळे मुंबईकरांबरोबरच उर्वरित महाराष्ट्राच्या ग्रामीण भागातील बळीराजा सुखावला होता. मात्र काही दिवस जोरदार हजेरी लावल्यानंतर पावसाने महाराष्ट्राकडे पाठ फिरवली आहे. परिणामी, महाराष्ट्राच्या ग्रामीण भागाबरोबरच मुंबई शहर व उपनगर परिसरात उकाडा प्रचंड वाढला आहे. जुलै सुरू झाल्यापासून मुंबईचे कमाल तापमान सरासरीपेक्षा जवळपास तीन अंशांनी अधिक नोंद होत आहे.

    किमान तापमानातही साधारण दोन अंशांची वाढ होत आहे. पारा ३३ अंशांच्या पुढील कमाल पातळीवर झेपावत आहे. याचदरम्यान हवेतील आर्द्रतेचे प्रमाणही ८० टक्क्यांच्या पुढे राहत असल्यामुळे मुंबईकरांच्या अंगाची प्रचंड लाहीलाही होत आहे. उर्वरित महाराष्ट्रात तर पाऱयाचा उन्हाळय़ाप्रमाणेच कहर सुरू आहे. रविवारी अकोल्यात ३८.३ अंश इतके राज्यातील सर्वाधिक कमाल तापमान नोंद झाले. अनेक जिह्यांमध्ये पाऊस गायब होऊन पारा ३५ ते ३७ अंशांच्या पुढे उसळल्यामुळे शेतकऱ्यांची चिंता वाढली आहे.