राज कुंद्राची उच्च न्यायालयात धाव, अटक बेकायदेशीर असल्याचा याचिकेतून दावा ; लवकरच सुनावणी पार पडण्याची शक्यता

सोमवारी अटक करण्यात आल्यानंतर कुंद्रा यांना दंडाधिकारी न्यायालयाने २३ जुलैपर्यत पोलीस कोठडी सुनावली होती. ती शुक्रवारी संपत असल्याने एलफिन्स्टन दंडाधिकारी न्यायालयाने त्यांच्या पोलीस कोठडीत २७ जुलैपर्यंत वाढ केली. त्याविरोधातच राज कुंद्राने उच्च न्यायालयात धाव घेतली आहे.

    मुंबई – अश्लील चित्रपटांची निर्मीती करून अॅप्सवर प्रदर्शित केल्याप्रकरणी अटक करण्यात आलेला उद्योगपती आणि बॉलीवूड अभिनेत्री शिल्पा शेट्टीचा पती राज कुंद्राने मुंबई उच्च न्यायालयात धाव घेतली आहे. आपल्याला करण्यात आलेली अटक ही बेकायदेशीर असल्याचा दावा कुंद्राने याचिकेतून केला आहे.

    प्रसिद्ध बॉलिवूड अभिनेत्री शिल्पा शेट्टीचे पती राज कुंद्राला सोमवारी (१९ जुलै) अश्लील चित्रपटांना पैसे पुरवण्याच्या आणि इंटरनेटवर अपलोड करण्याच्या कारणासाठी मुंबई पोलिसांनी अटक केली. भारतीय दंड संहितेच्या कलम २९२, २९३ (अश्लील सामग्रीची विक्री), ४२० (फसवणूक) तसेच कलम ६७ आणि ६७ ए (लैंगिक सामग्रीचे प्रसारण) माहिती तंत्रज्ञान कायदा आणि महिलांशी असभ्य वर्तनाच्या तरतुदींखालील विविध गुन्हे कुंद्रावर दाखल करण्यात आला आहे.

    सोमवारी अटक करण्यात आल्यानंतर कुंद्रा यांना दंडाधिकारी न्यायालयाने २३ जुलैपर्यत पोलीस कोठडी सुनावली होती. ती शुक्रवारी संपत असल्याने एलफिन्स्टन दंडाधिकारी न्यायालयाने त्यांच्या पोलीस कोठडीत २७ जुलैपर्यंत वाढ केली. त्याविरोधातच राज कुंद्राने उच्च न्यायालयात धाव घेतली आहे.

    कोणतीही कायदेशीर नोटीस न बजावता आपल्याला अटक कऱण्यात आली असल्यामुळे सदर अटक ही कायद्याचे पालन न करता करण्यात आली आहे आणि ती पूर्णपणे बेकायदेशीर असल्याचे कुंद्रा यांच्या याचिकेत नमूद करण्यात आले आहे.

    आपल्याकडील जप्त करण्यात आलेले साहित्य हे पोनोग्राफीच्या परिभाषेत बसत नसल्याचा दावाही कुंद्राने केला असून यावर्षी मार्च महिन्यातच सदर प्रकरणी आरोपपत्र दाखल करण्यात आले आहे. त्यामुळे आता अटकेची कोणतीही गरज नसल्याचा दावाही कुंद्राने आपल्या याचिकेतून केली आहे. सदर याचिकेवर लवकरच सुनावणी पार पडण्याची शक्यता आहे.