सार्वजनिक ठिकाणी पाळायचा ‘हा’ नियम मोडल्याने राज ठाकरेंना दंड

मनसे अध्यक्ष राज ठाकरे (MNS Chief Raj Thackeray)यांना सार्वजनिक ठिकाणी पाळायचा नियम मोडल्याने दंड भरावा लागला आहे. राज ठाकरे शुक्रवारी मुंबई ते मांडवा या रो-रो बोटीने अलिबागपर्यंत प्रवास करत असताना त्यांनी मास्क लावला नव्हता.तसेच ते धूम्रपानही करत होते. त्यामुळे त्यांना १ हजार रुपयांचा दंड ठोठावण्यात आला.एका इंग्रजी दैनिकाने याबाबत वृत्त प्रसिध्द केले आहे.

राज ठाकरे रो रो मधून प्रवास करताना बोटीच्या मोकळ्या भागात मास्क न घालता उभे होते. त्या दरम्यान ते सिगरेट ओढत होते.विशेष म्हणजे रो-रो बोटीत प्रवाशांनी धूम्रपान करु नये आणि मास्क परिधान करावा अशा सूचना देण्यात येत होत्या. हा प्रकार बोटीवरच्या कर्मचाऱ्यांच्या आणि अधिकाऱ्यांच्या लक्षात आला. त्यानंतर त्यांनी राज ठाकरे यांना बोटीच्या नियमांबाबत सांगितले. राज ठाकरेंना त्यांची चूक लक्षात येताच त्यांनी दिलगिरी व्यक्त केली आणि १ हजार रुपये दंडही भरला.