कोरोना काळानंतर राज ठाकरे यांचे राज्यभर झंझावाती दौरे : माजी आमदार बाळा नांदगावकर याची माहिती

महाराष्ट्राप्रती कोणतीही तडजोड नाही, येणाऱ्या निवडणुकांसाठी प्रचंड तयारी केली आहे. कोविडमुळे थोडे थांबलेत, ते जिथे जातील तिथे गर्दी होते. त्यामुळे ते बाहेर पडले नाहीत. मात्र कोविड काळानंतर त्यांचा झंझावाती दौरा सुरु होईल- बाळा नांदगावकर

    मुंबई:आगामी काळात होणाऱ्या  महापालिका निवडणुकांसाठी मनसेची प्रचंड तयारी झाली आहे. कोरोना काळानंतर राज ठाकरे यांचे झंझावाती दौरे सुरु होतील, अशी माहिती माजी आमदार बाळा नांदगावकर यांनी दिली आहे. मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांच्या वाढदिवसानिमित्त मुंबईत लसीकरण उपक्रमाचे उद्घाटन करण्यात आले. यावेळी बाळा नांदगावकर यांनी ही माहिती माध्यमांशी बोलताना दिली.

    संपूर्ण राज्यात विविध सामाजिक उपक्रम
    बाळा नांदगावकर म्हणाले, “वाढदिवस साजरा करण्यापेक्षा जनतेला कशात आनंद आहे ते करण्याच्या सूचना राज ठाकरे यांनी दिल्या होत्या. त्यानुसार आज संपूर्ण महाराष्ट्रात विविध सामाजिक उपक्रम हाती घेण्यात आले आहेत. लसीकरणाचा उपक्रम राबवणाऱ्यांचे स्वागत करतो. राज ठाकरेंना महाराष्ट्राबद्दल, देशाबद्दल कळकळ आहे. येत्या महानगर पालिका आणि इतर निवडणुकांची प्रचंड तयारी झाली आहे. कोरोनाकाळ संपल्यानंतर राज ठाकरे बाहेर पडतील.

    लवकरच झंझावाती दौरा सुरु
    राज ठाकरे यांचे चिंतन-मनन सुरु असते, महाराष्ट्रप्रती, लोकांप्रती समस्यांचे चिंतन मनन सुरु आहे. राज ठाकरेंनी महाराष्ट्राची ब्लू प्रिंट २०१४ ला अर्पण केली. तब्बल ८ वर्ष अभ्यास करुन त्यांनी महाराष्ट्राचे व्हिजन मांडले. महाराष्ट्राप्रती कोणतीही तडजोड नाही, येणाऱ्या निवडणुकांसाठी प्रचंड तयारी केली आहे. कोविडमुळे थोडे थांबलेत, ते जिथे जातील तिथे गर्दी होते. त्यामुळे ते बाहेर पडले नाहीत. मात्र कोविड काळानंतर त्यांचा झंझावाती दौरा सुरु होईल, असे बाळा नांदगावकर यांनी सांगितले.