राजावाडी रुग्णालयातील व्हायरल झालेल्या चित्रफितीविषयी रुग्णालयाने दिले स्पष्टीकरण

मुंबई: विविध सामाजिक माध्‍यमांवर राजावाडी महानगरपालिका सर्वसाधारण रुग्‍णालयासंबंधी प्रसारित करण्‍यात आलेल्‍या एका चित्रफितीमध्‍ये रुग्‍णालयातील एका कक्षामध्‍ये

 मुंबई: विविध सामाजिक माध्‍यमांवर राजावाडी महानगरपालिका सर्वसाधारण रुग्‍णालयासंबंधी प्रसारित करण्‍यात आलेल्‍या एका चित्रफितीमध्‍ये रुग्‍णालयातील एका कक्षामध्‍ये रुग्णांवर उपचार सुरू असलेल्या ठिकाणीच जवळील खाटेवर रुग्‍णाचा मृतदेह ठेवलेला दिसत आहेत. या चित्रफितीबाबत रुग्णालयाच्यावतीने स्पष्टीकरण देण्यात आले  आहे.

या स्पष्टीकरणातील मुद्दे पुढीलप्रमाणे : –

१)  चित्रफित कधीची आहे, याची नक्की कल्पना येत नाही, परंतु सत्‍यता आणि वास्तविकता पडताळण्यात येईल व योग्य ती कारवाई करण्यात येईल.   
 २)  राज्‍य शासनाने प्रसारित केलेल्‍या मार्गदर्शक तत्‍वानुसार, कोविड-१९ कक्षातील तसेच संशयित कोविड रुग्‍णांच्‍या कक्षातील मृतदेह, मृत्‍युनंतर ३० मिनिटामध्‍ये रुग्‍णाच्‍या कक्षातून हलविण्याचे संबंधितांना निर्देश देण्‍यात आलेले  आहेत. परंतु अनेकवेळा रुग्‍णाचे नातेवाईक त्वरित उपलब्‍ध नसतात. त्यांना वारंवार फोन करूनही ते येण्यास वेळ लागू शकतो. अशा वेळेस संबंधित पोलीस ठाण्यास कळवले जाते. रुग्ण मृत पावल्यास कागदपत्रांची खातरजमा करून, मृतदेह बॉडी बॅगमध्ये गुंडाळून नातेवाईकांना/पोलिसांना माहिती देऊन, तसेच सर्व प्रशासकीय प्रक्रिया पार पाडून मृतदेह शवागारात पुढील कार्यवाहीसाठी पाठविण्‍यात येतो. यास साधारण अर्धा तास लागतो, तसेच कोविड  कक्षाच्या मजल्यावरच मृतदेह ठेवण्यासाठी एक वेगळी खोली ठेवली असल्याकारणाने रुग्णाकक्षामध्ये मृतदेह जास्त वेळ ठेवला जात नसून लगेचच हलविला  जातो. 
३) असे असले तरी, अशाप्रकारच्या घटना भविष्‍यात घडू नयेत, म्‍हणून रुग्‍णालय प्रशासन सर्वप्रकारची काळजी घेत आहे. अशा घटनांची पुनरावृत्ती होऊ नये यासाठी सक्त निर्देश देण्यात येत आहेत.
४) कोविड १९ विषाणू विरुद्धच्या लढाईत आरोग्य यंत्रणा पूर्णपणे झोकून देऊन काम करीत आहे. बाधितांना तसेच सर्वसामान्य मुंबईकरांना योग्य ती आरोग्यसेवा मिळावी म्हणून महानगरपालिका प्रशासन वचनबद्ध आहे. अशा घटनांमुळे तसेच विविध अडचणीमुळे विचलित न होता यापुढेही खंबीरपणे आरोग्य यंत्रणा काम करीत राहील. आपणा सर्वांकडून सहकार्याची अपेक्षा आहे.