बेपत्ता मृतदेह प्रकरणाची पालिकेने घेतली गंभीर दखल – विशेष चौकशी करून ५ दिवसांमध्ये अहवाल करणार सादर

मुंबई: घाटकोपर पूर्वेकडील राजावाडी परिसरात असणारे बृहन्मुंबई महानगरपालिकेचे सेठ वाछीलाल छत्रभुज गांधी व मोनजी अमीदास व्होरा मनपा सर्वोपचार रुग्णालय आहे. हे रुग्णालय राजावाडी हॉस्पिटल या नावानेही

मुंबई: घाटकोपर पूर्वेकडील राजावाडी परिसरात असणारे बृहन्मुंबई महानगरपालिकेचे सेठ वाछीलाल छत्रभुज गांधी व मोनजी अमीदास व्होरा मनपा सर्वोपचार रुग्णालय आहे. हे रुग्णालय राजावाडी हॉस्पिटल या नावानेही ओळखले जाते. या रुग्णालयातील शवागारातून १ मृतदेह बेपत्ता झाल्याची बातमी विविध प्रसार माध्यामांतून प्रसारीत झाली आहे. या घटनेची महापालिका प्रशासनाने गंभीर दखल घेतली असून या घटनेची चौकशी करण्याचे आदेश दिले. त्यानुसार महापालिकेच्या उपनगरीय रुग्णालयांचे प्रमुख वैद्यकीय अधीक्षक प्रदीप जाधव यांनी या घटनेची सखोल चौकशी करण्यासाठी प्रमुख वैद्यकीय अधिकारी डॉ. प्रदीप आंग्रे यांची एक सदस्यीय चौकशी समिती नेमली असून पुढील ५ दिवसात त्यांना याबाबतचा अहवाल देण्याचे आदेश देण्यात आले आहेत. त्याचबरोबर भविष्यात अशी घटना पुन्हा होवू नये, यासाठी करावयाच्या उपाययोजना देखील अहवालामध्ये नमूद करण्याचेही त्यांना आदेशित करण्यात आले आहे. या अहवालानुसार जे व्यक्ती या घटनेबाबत दोषी आढळून येतील त्यांच्यावर महापालिका सेवानियमावलीनुसार कठोर कारवाई करण्यात येईल, असेही डॉ. जाधव यांनी सांगितले आहे.

राजावाडी रुग्णालयाच्या वैद्यकीय अधिकाऱ्यांद्वारे प्राप्त झालेली या घटनेबाबतची संक्षिप्त माहिती असे की,  ३ जूनच्या रात्री अकरा वाजेच्या सुमारास रुग्णालयाच्या आकस्मिक उपचार विभागात  एक २३ वर्षीय पुरुष रुग्णाला गंभीर जखमी अवस्थेत उपचारासाठी आणण्यात आले होते. तथापि, रुग्णालयात आल्यानंतर थोड्याच कालावधीत या रुग्णाचा मृत्यु झाला. सदर मृतदेहाचे शवविच्छेदन होणे गरजेचे असल्याने व त्यापूर्वी कोविड-१९ चाचणी करणे देखील गरजेचे असल्याने या मृतदेहाचे कोविड विषयक नमूने घेतल्यानंतर मृतदेह शवागारात ठेवण्यात आला. तथापि, सदर रुग्णाचा मृतदेह बेपत्ता असल्याचे ७ जून रोजी आढळून आले. यानंतर सदर प्रकरणी डॉ. आंग्रे यांची चौकशी समिती नेमण्यात आली असून चौकशीची कार्यवाही यापूर्वीच चालू झाली आहे.