राम कदमांच्या गुंडगुरीने घेतला साप्तेंचा बळी; राष्ट्रवादीचा गंभीर आरोप

संपूर्ण घटनाक्रम सांगत चव्हाण यांनी गोरेगावच्या चित्रनगरीत कशाप्रकारे गुंडाराज सुरू आहे याचे दाखले दिले आहेत. कलादिग्दर्शक राजेश साप्ते यांनी आत्महत्या केल्याची घटना दोन दिवसांपूर्वी उघडकीस आली. राजेश साप्ते यांनी आत्महत्येपूर्वी सुसाइड नोटमध्ये ज्यांची नावे लिहिली आहेत, त्यांनी गेली अनेक वर्षे सुमारे 45 हजारांवर कामगारांना वेठीस धरले आहे.

    मुंबई : गोरेगावच्या दादासाहेब फाळके चित्रनगरी येथे भाजपा आमदार राम कदम यांच्या नेतृत्वाखाली जे गुंडाराज सुरू आहे त्यानेच कला दिग्दर्शक राजेश साप्ते यांचा बळी घेतला असून खऱ्या गुन्हेगारांपर्यंत पोहचायचे असेल तर कदम यांना ताबडतोब अटक केली पाहिजे, अशी मागणी राष्ट्रवादी काँग्रेसच्या प्रवक्त्या विद्या चव्हाण यांनी केली आहे. चव्हाण यांनी सोमवारी पत्रकार परिषद घेऊन राजेश साप्ते आत्महत्या प्रकरणात कदम यांच्यावर अनेक गंभीर आरोप केले.

    संपूर्ण घटनाक्रम सांगत चव्हाण यांनी गोरेगावच्या चित्रनगरीत कशाप्रकारे गुंडाराज सुरू आहे याचे दाखले दिले आहेत. कलादिग्दर्शक राजेश साप्ते यांनी आत्महत्या केल्याची घटना दोन दिवसांपूर्वी उघडकीस आली. राजेश साप्ते यांनी आत्महत्येपूर्वी सुसाइड नोटमध्ये ज्यांची नावे लिहिली आहेत, त्यांनी गेली अनेक वर्षे सुमारे 45 हजारांवर कामगारांना वेठीस धरले आहे.

    लॉकडाऊन काळात सलमान खान, यशराज फिल्म्स आणि इतर काही निर्मिती संस्थांनी कामगारांसाठी 50 कोटी रुपये मदत म्हणून दिले होते. मात्र संबंधित युनियनने त्यातील 2 कोटी देखील गरीब कामगारांना मिळू दिले नाहीत. गोरेगावची संपूर्ण चित्रनगरी या लोकांनी काबीज केली असून तिथे गुंडाराज चालले आहे. या सर्वांचे नेतृत्व राम कदम करत असून त्यांना ताबडतोब अटक झाली तरच खऱ्या गुन्हेगारांपर्यंत पोहचता येईल, असे चव्हाण म्हणाल्या.