शेतकरी आंदोलनाबाबत रामदास आठवलेंची स्पष्ट भूमिका; केंद्र सरकारला दिला घरचा आहेर

मुंबई : कृषी कायद्यावरुन देशभरात सुरु असलेल्या शेतकरी आंदोलनाबाबत केंद्रीय सामाजिक न्याय राज्यमंत्री रामदास आठवले यांनी आपली भूमिका स्पष्ट केली आहे. यावेळी बोलताना त्यांनी केंद्र सरकारलाच घरचा आहेर दिला आहे.

केंद्र सरकारचे मंत्री दिल्लीतील शेतकऱ्यांच्या आंदोलनावर वेगवेगळे आरोप करीत आहेत. कुणी म्हणतात खलिस्तानी घुसले आहेत. कुणाला त्यात माओवादी घुसल्याची शंका आहे. तर, कुणाला यात चीन व पाकिस्तानचा हात असल्याचा दावा आहे. असे काहीही नसल्याचे स्पष्ट करीत आठवले यांनी केंद्र सरकारला घरचा आहेर दिला. सरकारने याप्रकरणी या शंका दूर करण्यासाठी चौकशी करावी, अशी मागणीही त्यांनी केली.

पंजाब व हरियाणा या दोन राज्यापुरतेच हे शेतकरी आंदोलन मर्यादित असल्याचा दावा करीत, शेतकऱ्यांनी आंदोलनाचे दिवस काढू नयेत, असे आपणास वाटत असल्याची भूमिकाही आठवलेंनी जाहीर केली.

केंद्र सरकार कृषी विधेयके मागे घेणार नाहीत. त्याऐवजी शेतकऱ्यांनीच दोन पावले आणि केंद्राने दोन पावले मागे घ्यावीत, अशी सूचनाही आठवलेंनी केली.

अंबानी आणि अदानी आधीच श्रीमंत आहेत. त्यांचे वेगवेगळे व्यवसाय आहेत. हे कृषी कायदे त्यांच्या फायद्यासाठी तयार करण्यात आले असतील, हा आरोपही आठवले यांनी फेटाळून लावला.

शेतकऱ्यांना जे कायद्यात नको आहे ते त्यांनी सांगावे, त्यावर तोडगा काढला जाऊ शकतो, असा विश्वासही आठवले यांनी व्यक्त केला आहे.