‘तुझं बाॅक्सिंग करिअर खराब करेल’ म्हणत अल्पवयीन विद्यार्थिनीवर बलात्कार

तिला तिचं स्वसंरक्षण करता यायला पाहिजे, यासाठी घरच्यांनी आपल्या 14 वर्षाच्या मुलीला बाॅक्सिंगचा क्लास लावला होता. मात्र, मुंबईच्या चेंबूर परिसरात एका बॉक्सिंग प्रशिक्षकानेच अल्पवयीन मुलीवर बलात्कार केल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. पोलिसांनी या प्रकरणात 30 वर्षीय बॉक्सिंग प्रशिक्षकाला अटक केली आहे.

    मुंबई (Mumbai).  तिला तिचं स्वसंरक्षण करता यायला पाहिजे, यासाठी घरच्यांनी आपल्या 14 वर्षाच्या मुलीला बाॅक्सिंगचा क्लास लावला होता. मात्र, मुंबईच्या चेंबूर परिसरात एका बॉक्सिंग प्रशिक्षकानेच अल्पवयीन मुलीवर बलात्कार केल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. पोलिसांनी या प्रकरणात 30 वर्षीय बॉक्सिंग प्रशिक्षकाला अटक केली आहे.

    पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, पीडित मुलगी 14 वर्षाची असून ती या प्रशिक्षकाकडे बाॅक्सिंगचे धडे घेत होती. काही दिवसांपूर्वी सदर मुलीची तब्येत ठीक नव्हती. तेव्हा तिला चांगलं वाटावं म्हणून फिरायला न्यायच्या बहाण्याने त्याने तिला त्याच्या घरी नेलं आणि संधी साधून तिच्यावर अत्याचार केला.

    घटनेनंतर, ही गोष्ट जर बाहेर कोणाला सांगितली तर तुझं बाॅक्सिंग करिअर बरबाद करेल, अशी धमकीही या प्रशिक्षकाने पीडित मुलीला दिली. मात्र, धमकीला न घाबरता पीडित मुलीनं पोलिस ठाण्यात जाऊन तक्रार नोंदवली आणि प्रशिक्षकाचं बिंग फुटलं. पोलिसांनी बुधवारी रात्री टिळक नगर येथून या नराधामाला अटक केलं आहे.

    दरम्यान, पीडित मुलीवर सध्या घाटकोपरच्या राजावाडी रुग्णालयात उपचार सुरु आहेत. मुलीच्या तक्रारीनंतर पोलिसांनी बॉक्सिंग कोचविरोधात कलम 376, 376 (3), 506 आणि पोक्सो कलम 4,6,8 अंतर्गत गुन्हा दाखल केला आहे. तसंच काही दिवसांपूर्वी महाबळेश्वरमधील माखरिया नावाच्या हायस्कूलमध्ये दिलीप ढेबे या मुख्याध्यापकाने एका अल्पवयीन विद्यार्थिनीवर बलात्कार केला होता. ही घटना ताजी असतानाच आता चेंबूर परिसरात बॉक्सिंग प्रशिक्षकानेच अल्पवयीन मुलीवर बलात्कार केल्याच्या घटनेनं माणुसकीला काळिमा फासला गेला आहे.