रश्मी शुक्ला यांनी पूर्वीच माफी मागितली होती, मुख्य सचिवांकडून मुख्यमंत्र्यांकडे अहवाल सादर ; अहवालाबाबत गोपनियता भंग आणि शिस्तभंगाची कारवाई अटळ?

रश्मी शुक्ला यांच्याबाबतचा फोन टॅपिंग प्रकरणाचा अहवाल मुख्य सचिवांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्याकडे सादर केला तसेच रश्मी शुक्ला यांच्यावर शिस्तभंग आणि गोपनियताभंग केल्या प्रकरणी तसेच शासकीय यंत्रणेचा दुरूपयोग केल्याबाबत कारवाई करण्याबाबत निर्णय घेण्यात आल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे.

  मुंबई : राज्यातील मंत्र्यांच्या फोन टॅपिंग प्रकरणात पोलीस अधिकारी रश्मी शुक्ला यांच्यावर कारवाई करण्याबाबतच अहवाल मुख्यसचिव सीताराम कुंटे यांनी मुख्यमंत्र्याना सादर केला असून त्यात शुक्ला यांच्या बाबतीत सरकारवर करण्यात आलेल्या आरोपात तथ्य नसल्याचे नमूद करण्यात आले आहे.  या अहवालात शुक्ला यांनी या चुकीच्या अहवालाबाबत महिला असल्याचे सांगत माफी मागितल्याचे सांगण्यात आले असून त्यांनंतर त्यांच्यामार्फत हा अहवाल विरोधीपक्षांना पुरविण्यात आल्याचा ठपका ठेवण्यात आला आहे. या अहवालात राज्याच्या गुप्तवार्ता विभागाच्या सनदी अधिकारी असताना मिळालेल्या अधिकारांचा दुरूपयोग करण्यात आल्याने रश्मी शुक्ला यांच्यावर शिस्तभंग आणि शासकीय यंत्रणेचा गैरवापर केल्याप्रकरणी कारवाई करण्याबाबत निर्णय घेण्याबाबत शिफारस मुख्यमंत्र्यांना सादर करण्यात आली आहे.

  शिस्तभंग आणि गोपनियताभंग

  रश्मी शुक्ला यांच्याबाबतचा फोन टॅपिंग प्रकरणाचा अहवाल मुख्य सचिवांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्याकडे सादर केला तसेच रश्मी शुक्ला यांच्यावर शिस्तभंग आणि गोपनियताभंग केल्या प्रकरणी तसेच शासकीय यंत्रणेचा दुरूपयोग केल्याबाबत कारवाई करण्याबाबत निर्णय घेण्यात आल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे. या अहवालात मुख्यसचिवांनी बदल्याबाबत कोणताही घोटाळा झाला नसल्याचा निष्कर्श नोंदविला आहे. वर्षा निवासस्थानी पार पडलेल्या बैठकीत राज्याचे मुख्य सचिव सीताराम कुंटे, उपमुख्यमंत्री अजित पवार उपस्थित होते. यामध्ये गृहमंत्री अनिल देशमुख यांच्यावर परमबीर सिंग यांचे भ्रष्टाचाराचे आरोप आणि फोन टॅपिंग, पोलिसातल्या बढती संदर्भातील रॅकेट, तसेच परमबीरसिंग यांनी दाखल केलेल्या याचिकेवर चर्चा करण्यात आली. या बैठकीला जितेंद्र आव्हाड, नवाब मलिक, एकनाथ शिंदे आणि अनिल परबही उपस्थित होते.

  बचावासाठी भाजप सरसावली

  रश्मी शुक्ला यांच्यावर कारवाईचे संकेत मिळताच बचावासाठी भाजपचे नेते सरसावले आहेत. राज्य सरकार चौकशीच्या माध्यमातून रश्मी शुक्ला सारख्या ज्येष्ठ महिला अधिका-यांच्या प्रामाणिक अहवालावर प्रश्नचिन्ह निर्माण करून त्याच्यावर दबाव निर्माण करु पाहत आहे, असा आरोप भाजपचे नेते प्रवीण दरेकर यांनी केला. सरकार चौकशीची इतकी घाई का करत आहे? सरकारने प्रथम पोलीस दलातील बदल्यांच्या रॅकेटची चौकशी करावी. त्या चौकशीत रश्मी शुक्ला यांची चूक असेल तर ती समोर येईल, असे प्रवीण दरेकर यांनी सांगितले.

  जितेंद्र आव्हाड यांचे आरोप फेटाळले

  रश्मी शुक्ला यांनी अपक्ष आमदार राजेंद्र यड्रावकर यांना धमकावल्याचा आरोप जितेंद्र आव्हाड यांनी केला. मात्र, मला आव्हाडांचं वक्तव्य म्हणजे राजेंद्र यड्रावकर यांचे अवमूल्यन वाटते. कुठलाही आमदार नेता अशाप्रकारे दबावाला बळी पडत नसतो. एवढा कमकुवत लोकप्रतिनिधी नसतो. त्यामुळे जितेंद्र आव्हाडांच्या बोलण्यात तथ्य वाटत नाही, असे प्रवीण दरेकर यांनी म्हटले आहे.