रश्मी शुक्ला फोन टॅपिंग: २०१८ च्या प्रकरणी उच्चस्तरीय चौकशीचे गृहमंत्र्यांचे आदेश 

समाजविघातक कृत्यांवर आळा घालण्याच्या नावाखाली हे फोन टॅपिंग करण्यात आले, यासाठी माझा फोन नंबर अमजद खान नावाने टॅप करण्यात आला. हे फोन टॅपिंग कोणाच्या आदेशावरून करण्यात आले? यामागचा सुत्रधार कोण? याची चौकशी करण्याची मागणी महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष नाना पटोले यांनी यावेळी सभागृहात केली.

  मुंबई : काँग्रेसच्या नाना पटोले यांच्यासह अन्य लोकांचे फोन २०१७-१८ साली टॅप करण्याप्रकरणी उच्चस्तरीय चौकशी करून दोषींवर कारवाई करण्याची गृहमंत्री दिलीप वळसे पाटील अशी घोषणा आज विधानसभेत केली. हा मुद्दा पाटोले आणि इतर सदस्यानी सभागृहात जोरदारपणे उपस्थित केला होता, पटोले यांनी टॅपिंगचा सूत्रधार कोण ते शोधून काढा आणि त्याच्यावरही कारवाई करा अशी मागणी त्यांनी केली होती.

  भास्कर जाधव यांना धमक्या

  पुण्यातील कला दिग्दर्शक राजू सापते यांच्या आत्महत्ये प्रकरणी उद्याच उच्चस्तरीय बैठक घेऊन जबाबदार व्यक्तींवर तात्काळ कारवाईचे आदेश देऊ असेही गृहमंत्र्यांनी  यावेळी जाहीर केले. तालिका अध्यक्ष भास्कर जाधव यांनी काल केलेल्या कारवाई बद्दल त्यांना कालपासून येणाऱ्या धमक्या लक्षात घेऊन त्यांना आवश्यक संरक्षण पुरवले जाईल असेही गृहमंत्र्यांनी स्पष्ट केले.

  या बाबतीत शिवसेनेच्या सुनील प्रभू यांच्यासह अनेकांनी सभागृहात मुद्दा उपस्थित केला होता. शिवसेना सदस्य प्रताप सरनाईक यांच्यावरील आरोपांबाबत सुरू असलेल्या आर्थिक गुन्हे अन्वेषण शाखेकडच्या तपासाबाबतचा  प्रगती अहवाल मागवून घेऊ, तसेच mmrda कडून ही माहिती मागवली जाईल असे गृहमंत्र्यांनी घोषित केले, अशी मागणी स्वतः सरनाईक यांनीच सभागृहात केली होती .

  फोन टॅपिंग करायला लावणारा मुख्य सुत्रधार कोण?

  समाजविघातक कृत्यांवर आळा घालण्याच्या नावाखाली हे फोन टॅपिंग करण्यात आले, यासाठी माझा फोन नंबर अमजद खान नावाने टॅप करण्यात आला. हे फोन टॅपिंग कोणाच्या आदेशावरून करण्यात आले? यामागचा सुत्रधार कोण? याची चौकशी करण्याची मागणी महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष नाना पटोले यांनी यावेळी सभागृहात केली.

  नंबर माझा आणि अमजद खान असे मुस्लीम नाव

  नाना पटोले पुढे म्हणाले की, अमली पदार्थांची तस्करी करत असल्याचे दाखवून माझा फोन टॅप करण्यात आला. नंबर माझा आणि अमजद खान असे मुस्लीम नाव ठेवण्यात आले. मुस्लीम धर्माचे नाव देऊन हिंदू मुस्लीम वाद निर्माण करुन राजकारण करायचे होते काय? माझ्यासह इतर काही लोकप्रतिनिधींचे फोनही टॅप करण्यात आले.

  अशा प्रकारे लोकप्रतिनिधींचे फोन टॅप करणे ही सर्वांसाठी धोक्याची घंटा आहे. लोकप्रतिनिधींना सार्वजनिक जिवनातून बरबाद करण्याचे काम करण्याचा हा प्रयत्न आहे. सभागृहातच अनिल देशमुख करु, भुजबळ करू, अशा धमक्या दिला जात आहेत हे लोकशाहीसाठी अत्यंत घातक आहे.

  उच्चस्तरीय चौकशी करण्यात येईल

  यावेळी गृहमंत्री दिलीप वळसे पाटील म्हणाले की, फोन टॅपिंग करणे हा गंभीर प्रकार असून अशा प्रकरणात रितसर परवानगी घेणे गरजेचे आहे परंतु तशी प्रक्रिया या प्रकरणात पार पाडल्याचे दिसत नाही. याप्रकरणाची उच्चस्तरीय चौकशी करण्यात येईल. उद्याच या प्रकरणी उच्च अधिकाऱ्यांची बैठक घेऊन माहितीही घेऊ असे वळसे पाटील यांनी सभागृहाला सांगितले.