भाजपाविरोधात भूमिका घेऊन लोकांना संभ्रमित करण्याचा केविलवाणा प्रयत्न सरकार करीत असले तरी आता पुलाखालुन बरंच पाणी वाहून गेलं आहे, येणाऱ्या काळात गृह मंत्र्यांपासून अनेक लोकं कसे संबंधित आहेत, हे कळेलचं, असा दावा दरेकर यांनी केला.

    मुंबई : माजी पोलीस आयुक्त परमबीर सिंग यांनी गृहमंत्री अनिल देशमुख यांच्यावर गंभीर आरोप केला आहे. यामुळे राज्याचं राजकारण तापतं आहे. याचं पार्श्वभूमीवर विधान परिषदेचे विरोधी पक्षनेते प्रविण दरेकर यांनी महाविकास आघाडी सरकारवर टीका केली आहे. म्हणाले की, संजय राऊत हे विषयापासून पळ काढत आहेत, पण इथे प्रश्न “अनिल देशमुख” यांचा नाही तर  गृहमंत्री पदाचा, राज्याच्या कायदा-सुव्यवस्थेचा आहे.  गृहमंत्री स्वतः १०० कोटीची खंडणी गोळा करण्याचे आदेश पोलीस अधिकाऱ्यांना देत आहेत, त्यामुळे पोलिसांची आणि राज्याची प्रतिमा मलिन होत आहे. देशमुखांकडे व्यक्ती म्हणून न पाहता पोलिसांचे प्रमुख, राज्याचे गृहमंत्री म्हणून पाहिले पाहिजे. त्यामुळेचं या विषयापासून संजय राऊतांना पळ काढता येणार नाही, ते  लोकांना संभ्रमित करण्याचा केविलवाणा प्रयत्न करीत आहेत, असे प्रत्यूत्तर दरेकरांनी संजय राऊत यांना दिलं आहे.
    दरम्यान माजी पोलीस आयुक्त परमबीर सिंग यांनी गृहमंत्री अनिल देशमुखांवर गंभीर आरोप केल्याने राज्यातील राजकीय वातावरण ढवळून निघाले आहे. परमबीर सिंग यांच्या पत्रामुळे महाविकास आघाडी सरकार कोंडीत सापडल्याचे चित्र असून, दुसरीकडे भाजपाही आक्रमक झाली आहे. यासंदर्भात बोलताना शिवसेना खासदार संजय राऊत यांनी,’अनिल देशमुखांचा प्रश्न हा काय राज्याचा प्रश्न आहे का?’ असा सवाल उपस्थित केला. यावर दरेकरांनी राऊतांचा समाचार घेतला.  परमबीर कुणाचे डार्लिंग हे स्पष्ट परमबीर सिंग आता विरोधकांचे डार्लिंग बनले आहेत, असे वक्तव्य संजय राऊत यांनी केले होते.

    संजय राऊतांच्या वक्तव्यावर दरेकर म्हणाले की, संजय राऊत यांच्या भूमिका रोज बदलत असतात, दोन दिवसांपूर्वीच परमबीर सिंग यांनी कोविड काळात केलेल्या उत्तम कामाबद्दल त्यांचा गौरव सामना मधून करण्यात आला होता. त्यामुळे परमबीर हे कुणाचे डार्लिंग आहेत, हे स्पष्ट होते.  हे सर्व बाजूला सारुन परमबीर यांनी केलेल्या आरोपातील सत्यता पडताळणे महत्वाचे आहे.  परमबीर सिंग बचावासाठी आरोप करीत आहेत, असे जर सरकारला वाटत असेल तर मग सरकार त्यांचे निलंबन का करत नाही ?  स्वत:च्या  बचावासाठी तर सरकार परमबीर सिंग यांच्यावर आरोप करीत नाही ना ?  सचिन वाझे ओसामा बीन लादेन आहे का, अशी पाठराखण मुख्यमंत्र्यांनीच केली होती, त्या वाझेंचे काय झाले, हे सर्वाना माहीत आहे. सरकारच्या भूमिका सोयीनुसार बदलताना दिसून येत आहेत. पण भाजपाविरोधात भूमिका घेऊन लोकांना संभ्रमित करण्याचा केविलवाणा प्रयत्न सरकार करीत असले तरी आता पुलाखालुन बरंच पाणी वाहून गेलं आहे, येणाऱ्या काळात गृह मंत्र्यांपासून अनेक लोकं कसे संबंधित आहेत, हे कळेलचं, असा दावा दरेकर यांनी केला.