कुख्यात गुंड रवी पुजारीला १४ दिवसांची पोलीस कोठडी; मुंबईतील विशेष मोक्का न्यायालयाचा निर्णय

रवी पुजारीला भारतात प्रत्यार्पण करण्यात येत असतानाच मध्येच कर्नाटक पोलिसांनी एका खटल्याची कागदपत्र पुढे करून रवी पुजारीचा ताबा मिळवला. कर्नाटक पोलिसांकडून पुजारीचा ताबा घेऊन मुंबई पोलीसांकडून काही दिवसांपूर्वीच मुंबईत आणण्यात आले.

  मुंबई : दोन वर्षांपूर्वी दक्षिण आफिकेतून प्रत्यार्पण करून भारतात आणलेल्या कुख्यात गुंड रवी पुजारीला गजाली रेस्टॉरंटमधील गोळीबार प्रकऱणी मंगळवारी मुंबईतील विशेष मोक्का न्यायालयात हजर करण्यात आले न्यायालयाने पुजारीला १४ दिवसांची पोलीस कोठडी सुनावली.

  अनेक वर्षांपासून फरार असलेला रवी पुजारीला गतवर्षी मार्चमध्ये दक्षिण आफ्रिकेतील सेनेगलमध्ये अटक करण्यात आली होती. यानंतर ला भारताला सोपाविण्यात यावे म्हणनू खटला चालवण्यात आला. तेव्हा, पुजारीवर हत्या, हत्येचा प्रयत्न आणि खंडणी अशा स्वरूपाचे अनेक गुन्हे दाखल असून त्याला आमच्या ताब्यात द्या, असा युक्तिवाद मुंबई पोलिसांकडून करण्यात आला होता. रवी पुजारीला भारतात प्रत्यार्पण करण्यात येत असतानाच मध्येच कर्नाटक पोलिसांनी एका खटल्याची कागदपत्र पुढे करून रवी पुजारीचा ताबा मिळवला. कर्नाटक पोलिसांकडून पुजारीचा ताबा घेऊन मुंबई पोलीसांकडून काही दिवसांपूर्वीच मुंबईत आणण्यात आले.

  २०१६ मध्ये विलेपार्ले येथील हॉटेल गजाली येथे खंडणीसाठी आलेल्या त्याच्या साथीदाराने एका व्यावसायिकावर गोळ्या झाडल्या होत्या. याप्रकरणी खंडणीविरोधी पथकाने ८ जणांना अटक करून त्यांच्याविरोधात न्यायालयात आरोपपत्र दाखल केले होते. प्रकऱणातील मुख्य फरार आरोपी असलेल्या रवी पुजारीला ताब्यात घेण्यासाठी खंडणीविरोधी पथकाने न्यायालयात प्रत्यार्पणचा अर्ज दाखल केला होता. शनिवारी त्याला मंजुरी मिळाली होती. त्यानुसार रवी पुजारीला ताब्यात घेण्यात आल्यानंतर मुंबई पोलिसांनी मंगळवारी सकाळी विशेष मोक्का न्यायालयात आण्यात आले. तेव्हा, न्यायालयाचे न्या. डी. ई कोथळीकर यांनी रवी पुजारीला १४ दिवसांची पोलीस कोठडी सुनावली.

  रवी पुजारी हा आंतरराष्ट्रीय गँगस्टर असून एकेकाळी मुंबईतील बिल्डर, बार मालक यांना रवी पुजारी आपल्या तालावर नाचवत होता. रवी पुजारीवर मुंबईत विविध कलमांतर्गत गुन्हे दाखल असून अनेक बड्या आणि प्रसिद्ध व्यक्तींना त्याने खंडणीसाठी धमकावले आहे. त्याचा ताबा मिळाल्याने मुंबई पोलिसांना मिळाल्याने अनेक गुंतागुंतीचे गुन्हे उघडकीस येण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे.

  रवी पुजारीवर किती गुन्हे दाखल?

  रवी पुजारी हा मागील २० वर्षांपासून फरार आहे. त्याच्याविरोधात सुमारे १०० च्यावर गुन्हे दाखल आहेत. अनेक राज्यात त्याच्याविरोधात गुन्हे दाखल आहेत. त्यात बंगळुरूत ३९, मेंगलोरमध्ये ३६, उड्डपीत ११, हुबळी-धारवाड,कोलाक, शिवमोगा, येथे प्रत्येक एक गुन्हा दाखल आहे. त्याव्यतिरिक्त मुंबई आणि आजूबाजूच्या एमएमआरडीए रिजनमध्ये सुमारे ७८ गुन्हे दाखल झाले आहेत. मुंबई पोलीस दलात ४९ गुन्हे आहेत. तर मोक्काचे २६ गुन्हे आहेत. मुंबई पोलीस दलात दाखल झालेल्या १० मोठ्या गुन्ह्यांच्या आधारावर त्याला भारताच्या हवाली करण्यात आलं आहे. आता त्याच्या विरोधात लवकरात लवकर खटले चालवून त्याला शिक्षा व्हावी यासाठी मुंबई पोलीस प्रयत्न करत आहेत.

  मूळचा कर्नाटकातील मालपेचा रहिवासी

  रवी पुजारी मूळचा कर्नाटकातील मालपे (जि. उडपी) येथील असून, १९९० पासून मुंबईत अंडरवर्ल्डमध्ये शार्प शूटर म्हणून सुरुवातीला गँगस्टर छोटा राजनच्या टोळीत काम मकरत होता. त्यानंतर पुजारीने स्वतःची टोळी बनविली. मुंबईसह बंगळुरू, मंगळूर येथील विविध व्यावसायिकावर, बॉलिवूड, बिल्डर यांच्याकडे खंडणी गोळा करू लागला होता. त्याच्यावर हत्या, हत्येचा प्रयत्न, खंडणीचे अनेक गुन्हे दाखल असून, त्यामध्ये तो मुख्य आरोपी आहे. परदेशात पलायन केल्यानंतर सहकाऱ्यांमार्फत त्याने हे काम सुरू ठेवले होते. त्याच्याविरुद्ध रेड कॉर्नर नोटीसही बजाविण्यात आली होती.