“आज साहेब असते तर मला आशीर्वाद देऊन म्हणाले असते नारायण तू…” बाळासाहेबांच्या स्मृतीस्थळाला अभिवादन केल्यानंतर नारायण राणे यांची प्रतिक्रिया

शिवसेनेच्या स्थापनेपासून शिवसेनेचा दसरा मेळावा व अनेक सभा या शिवाजी पार्कमध्ये होतात. शिवाय या भागात शिवसेनेची मजबूत पकड असल्याने याला शिवसेनेचा बालेकिल्ला असेही म्हटले जाते. त्यामुळे राणेंचा आजचा दौरा विशेष चर्चेचा होता.

    केंद्रीय मंत्री नारायण राणे यांची आज मुंबईत बहूचर्चित जन आशीर्वाद यात्रेला सुरूवात झाली. केंद्रीय मंत्री राणे मुंबईत आल्यावर बाळासाहेबांच्या स्मृतीस्थळाचे दर्शन घेतले. तसेच चैत्यभूमीवर जाऊन त्यांनी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळल्या आभिवादन केले.

    बाळासाहेबांच्या स्मृतीस्थळाला अभिवादन केल्यानंतर राणेंनी पत्रकारांशी संवाद साधला. यावेळी ते म्हणाले की, “साहेब आज हवे होते. ते असते तर त्यांनी नक्कीच मला आशीर्वाद दिला असता आणि म्हणाले असते नारायण तू असाच पुढे जात राहा. साहेबांचा हात जरी आज माझ्या डोक्यावर नसला तरी त्यांचे आशीर्वाद नक्कीच माझ्यासोबत आहेत असं मी समजतो”, असं नारायण राणे म्हणाले.

    नारायण राणेंना बाळासाहेब ठाकरेंच्या स्मृतींना अभिवादन करू देणार नाही अशी भूमिका शिवसेनेच्या कार्यकर्त्यांनी घेतली होती. त्यामुळे दादरच्या शिवाजी पार्क परिसरात मोठा पोलीस बंदोबस्त ठेवण्यात आला होता. याच मुद्द्यावरुन राणेंनी शिवसेना नेत्यांना टोला लगावला. “स्मृतीस्थळ आणि स्मारकांवर कुणाला रोखण्याचा प्रकार कुणी करू नये. बाळासाहेब ही काही कुणाची खासगी मालमत्ता नव्हते. ते संपूर्ण राज्याचे आणि देशाचे नेते होते. त्यांच्याबद्दल प्रत्येकालाच खूप आदर आणि अभिमान आहे. त्यामुळे त्यांचे आशीर्वाद घेण्यापासून कुणी कुणाला रोखू शकत नाही. तसेच बाळासाहेबांच्या स्मृतीस्थळाचे दर्शन रोखणारे त्यांची उंची कमी करत आहेत अशी टीका सुद्धा नारायण राणेंनी केली.

    दरम्यान, शिवसेनेच्या स्थापनेपासून शिवसेनेचा दसरा मेळावा व अनेक सभा या शिवाजी पार्कमध्ये होतात. शिवाय या भागात शिवसेनेची मजबूत पकड असल्याने याला शिवसेनेचा बालेकिल्ला असेही म्हटले जाते. त्यामुळे राणेंचा आजचा दौरा विशेष चर्चेचा होता.