महाविद्यालयांमध्येही शुल्क कपात करा; विद्यार्थी, प्राध्यापकांकडून मागणी

अनेक महाविद्यालये व्यावसायिक अभ्यासक्रमांसाठी कॉर्पोरेट गणवेश ठेवतात. यामुळे गणवेश शुल्कापासून विविध सोयी सुविधांचे शुल्क आकारले जाते. महाविद्यालयांनी विद्यार्थ्यांकडून केवळ शैक्षणिक शुल्क आकारणी करावी आणि इतर शुल्क न आकारता त्यांना सवलत द्यावी अशी मागणी विद्यार्थी संघटनांकडून होत आहे.

    मुंबई: वर्षभरात महाविद्यालयात न गेलेल्या विद्यार्थ्यांकडून जिमखाना शुल्क, ग्रंथालय शुल्क, मैदान शुल्क, कम्प्युटर लॅब शुल्क अशा विविध मथळ्यांखाली शुल्क आकारण्यात येत आहे. या विद्यार्थ्यांना शुल्कात सवलत द्यावी अशी मागणी वर्षभरापासून होत आहे. याकडे विद्यापीठाकडून दुर्लक्ष करण्यात येत असल्याने महाविद्यालयांकडून विद्यार्थ्यांकडून शुल्क आकारणी कायम आहे. त्यामुळे विद्यार्थ्यांकडून संताप व्यक्त करण्यात येत आहे.

    शहरातील विविध महाविद्यालयांमध्ये अनुदानित अभ्यासक्रमांचे शुल्क विद्यापीठाने निश्चित केलेले आहे. यामुळे महाविद्यालयांना तेवढेच शुल्क आकारावे लागते. मात्र स्वयंअर्थसहित अभ्यासक्रमांसाठी शुल्क आकारताना महाविद्यालयांवर मर्यादित बंधने आहेत. यामुळे अनेक महाविद्यालये व्यावसायिक अभ्यासक्रमांसाठी कॉर्पोरेट गणवेश ठेवतात. यामुळे गणवेश शुल्कापासून विविध सोयी सुविधांचे शुल्क आकारले जाते. महाविद्यालयांनी विद्यार्थ्यांकडून केवळ शैक्षणिक शुल्क आकारणी करावी आणि इतर शुल्क न आकारता त्यांना सवलत द्यावी अशी मागणी विद्यार्थी संघटनांकडून होत आहे. दीड वर्षांपासून सुरू असलेल्या कोरोनामुळे अनेकांचे रोजगार गेले, अनेकांची वेतन कपात झाली, अनेक विद्यार्थ्यांच्या पालकांचे छत्र हरपले, तर काही विद्यार्थ्यांनाही कोरोनाचा सामना करावा लागला आहे. यामुळे विद्यार्थ्यांची आर्थिक स्थिती अतिशय बिकट झाली आहे. यामुळे विद्यार्थ्यांकडून २० ते ४५ हजारापर्यंतची शुल्क आकारणी करू नये अशी विनंती काही प्राध्यापकांनी केली. तर विद्यार्थ्यांचे शैक्षणिक नुकसान होऊ नये म्हणून काही प्राध्यापकांनी स्वत:च्या खिशातून विद्यार्थ्यांचे शैक्षणिक शुल्क भरले. जूनमध्ये सुरू होणार्‍या शैक्षणिक वर्षाची प्रवेश प्रक्रिया सध्या सुरू आहे. हे प्रवेश देत असताना विद्यार्थ्यांना शुल्क दिलासा द्यावा अशी मागणी प्राध्यापक तसेच प्राचार्‍यांकडून होत आहे.