रेम्डेसिवीर इंजेक्शन १५०० रुपयात मिळणार; कोरोनाबाधित रुग्णांना दिलासा

कोविड-१९ आजाराच्या उपचारासाठी महत्वाचे मानले जाणारे रेम्डेसिवीर इंजेक्शन आता दीड हजार रुपयात मिळण्याची शक्यता आहे. मध्यंतरी कोरोना रुग्णांची संख्या घसरलेली असताना या इंजेक्शनची किंमत उतरली होती. मात्र तरीही पूर्वीच्या दराने या औषधाची विक्री होत होती, याची तक्रार अन्न व औषध प्रशासन विभागाला करण्यात आली होती.

    मुंबई (Mumbai).  कोविड-१९ आजाराच्या उपचारासाठी महत्वाचे मानले जाणारे रेम्डेसिवीर इंजेक्शन आता दीड हजार रुपयात मिळण्याची शक्यता आहे. मध्यंतरी कोरोना रुग्णांची संख्या घसरलेली असताना या इंजेक्शनची किंमत उतरली होती. मात्र तरीही पूर्वीच्या दराने या औषधाची विक्री होत होती, याची तक्रार अन्न व औषध प्रशासन विभागाला करण्यात आली होती.

    याबाबत अन्न व औषध प्रशासन मंत्री डॉ.राजेंद्र शिंगणे आणि वैद्यकीय शिक्षण व औषधी द्रव्ये विभागाचे सचिव सौरभ विजय यांनी या प्रकरणी कार्यवाही घेण्याच्या दिलेल्या सुचने नुसार अन्न व औषध प्रशासनाच्या अधिकाऱ्यांनी पडताळणी केली. या वेळी रेम्डेसिवीर इंजेक्शनच्या उत्पादकांनी सदर औषधाची विक्री रुग्णालयांना तसेच रुग्णालयांना पुरवठा करणाऱ्या घाऊक विक्रेत्यांना सुमारे ८०० ते १३०० रुपयांनी म्हणजे सरासरी १०४०/- रुपये किंमतीत केल्याचे आढळून आले.

    याबाबत रुग्णालयांनी रुग्णांना आकारलेल्या किंमतीबाबत पडताळणी केली असता काही रुग्णालये त्यांच्या खरेदी किमतीवर १० ते ३० % अधिक रक्कम आकारून छापील किमती पेक्षा कमी किमतीत रुग्णास विकत असल्याचे स्पष्ट झाले. परंतु बहुतांश रुग्णालये खरेदी किंमत कमी असून देखील छापील किंमत आकारून मोठ्या प्रमाणावर नफा कमावत असल्याचे दिसून आले आहे. त्यामुळे याबाबत अन्न व औषध प्रशासन आयुक्त यांनी याबाबत दखल घेवून सदर रेम्डेसिवीर इंजेक्शन ची उत्पादकांची विक्री किंमत व प्रत्याक्षात रुग्णांना आकारण्यात येणारी किंमत यामधील तफावत कमी करण्याच्या दृष्टीने पाऊले उचलण्यास सुरवात केली.