नवी मुंबई तलावावरील अतिक्रमणे हटवा! ; उच्च न्यायालयाचे NMMCला आदेश

नवी मुंबईतील नेरळ येथे साधारणतः २८ हेक्टरमध्ये लोटस तलाव पसरला आहे. या तलावात कमळाची असंख्य फुले येतात. तसेच इथे मोठ्या प्रमाणात कांदळवनेही आहेत. म्हणूनच सदर तलावाला २०१७ मध्ये पाणथळ म्हणून मान्यता प्राप्त झाली आहे. मात्र, कोरोना टाळेबंदीच्या काळात काही समाजकंटकांनी तलावात बांधकामांचा कचरा, मलबा आणून टाकला आहे.

    मुंबई : नवी मुंबईतील पाणथळ म्हणून घोषित करण्यात आलेल्या तलावामध्ये मोठ्या प्रमाणात डेब्रिज टाकण्यात आले आहे. त्याची दखल घेत मुंबई उच्च न्यायालयाने आठवड्याभरात तलावातील डेब्रिज काढून स्वच्छ करण्याचे आदेश नवी मुंबई महानगर पालिकेला दिले.

    नवी मुंबईतील नेरळ येथे साधारणतः २८ हेक्टरमध्ये लोटस तलाव पसरला आहे. या तलावात कमळाची असंख्य फुले येतात. तसेच इथे मोठ्या प्रमाणात कांदळवनेही आहेत. म्हणूनच सदर तलावाला २०१७ मध्ये पाणथळ म्हणून मान्यता प्राप्त झाली आहे. मात्र, कोरोना टाळेबंदीच्या काळात काही समाजकंटकांनी तलावात बांधकामांचा कचरा, मलबा आणून टाकला आहे. त्यामुळे पर्यावरणाची हानी होत असून तलावाचेही अस्तित्व धोक्यात आले आहे.

    यासंदर्भात स्थानिक पर्यावरण प्रेमींनी नवी मुंबई महानगर पालिकेकडे वारंवार तक्रार करूनही परिस्थितीत सुधारणा होत नसल्यामुळे त्यासंदर्भात उच्च न्यायालयात जनहित याचिका दाखल करण्यात आली आहे. त्यावर मुख्य न्या. दीपांकर दत्ता आणि न्या. गिरीश कुलकर्णी यांच्या खंडपीठासमोर व्हिसीमार्फत सुनावणी पार पडली. तेव्हा, याचिकाकर्त्यांकडून तलावाची सद्यस्थिती दर्शविणारी छायाचित्रे न्यायालयात सादर करण्यात आली. त्याची दखल घेत खंडपीठाने पालिकेकडे विचारणा केली.

    त्यावर पालिकेने जबाबदारी सिडकोवर ढकलली. मात्र, एकमेकांना जबाबदारी ढकलण्यापेक्षा प्रश्न मार्गी लावा, असे खंडपीठाने पालिका प्रशासनला सुनावले. त्यावर पुढील आठवड्याभरात तलावातील मलबा हटविण्यात येईल, अशी हमी पालिकेच्यावतीने देण्यात आली. त्याची दखल घेत याचिकाकर्त्यांना पुढील गुरुवारी तलावाचे फोटो काढून न्यायालयात सादर करण्याचे निर्देश देत खंडपीठाने सुनावणी शुक्रवारपर्यंत तहकूब केली.

    remove encroachments on Navi Mumbai Lake High Court orders NMMC