republic tv two members got summons from mumbai police
अडचणी वाढल्या; फेक TRP प्रकरणी Republic Tv च्या दोन अधिकाऱ्यांना समन्स !

या प्रकरणी रिपब्लिक टीव्हीचे (Republic Tv) मुख्य वित्तीय अधिकारी शिवा सुब्रमण्यम सुंदरम (Shiva Subramaniam Sundaram) यांना शनिवारी चौकशीसाठी हजर राहण्यासाठी समन्स (Summons) बजाविले.त्याचप्रमाणे ‘फक्त मराठी’ आणि ‘बॉक्स मराठी’सह दोन जाहिरात कंपनीच्या प्रमुखांना मुंबई पोलिसांनी समन्स बजावल्याची माहिती पोलीस सहआयुक्त मिलिंद भारंबे यांनी दिली.

मुंबई: मुंबई पोलिस आयुक्त परमवीर सिंग यांनी पत्रकार परिषद घेत टीव्ही वृत्त व मनोरंजन वाहिन्यांचा टीआरपी (टेलीव्हिजन रेटिंग पॉइंट) मध्ये होत असलेला घोटाळा उघडकीस आणला. यानंतर आता रिपब्लिक टिव्हीच्या अडचणींमध्ये वाढ होण्यास सुरूवात झाली आहे. या प्रकरणी रिपब्लिक टीव्हीचे मुख्य वित्तीय अधिकारी शिवा सुब्रमण्यम सुंदरम यांना शनिवारी चौकशीसाठी हजर राहण्यासाठी समन्स बजाविले.त्याचप्रमाणे ‘फक्त मराठी’ आणि ‘बॉक्स मराठी’सह दोन जाहिरात कंपनीच्या प्रमुखांना मुंबई पोलिसांनी समन्स बजावल्याची माहिती पोलीस सहआयुक्त मिलिंद भारंबे यांनी दिली.

टीआरपी रेटिंगमध्ये फेरफार केला जात असून त्यासाठी लोकांना ४०० ते ५०० रूपये चॅनेल पाहण्यासाठी दिले जात असल्याची धक्कादायक माहिती उघडकीस आली होती.त्यानंतर या घोटाळ्याशी संबंधित हंसा एजन्सीचे माजी कर्मचारी दिनेश विश्वकर्मा आणि विनय त्रिपाठी हे फरार असून, त्यांचा शोध सुरू आहे.

अधिकाधिक जाहिराती पदरी पाडून घेण्यासाठी कृत्रिमरित्या ‘टीआरपी’ वाढवणाऱ्या रॅकेट प्रकरणी हंसा कंपनीच्या विशाल भंडारीसह चौघांना अटक करण्यात आली आहे. रिपब्लिक टीव्हीवर टीआरपी घोटाळ्याचा ठपका बसताच, टीआरपीबाबत दाखल गुन्ह्याची एफआयआर कॉपी सोशल मीडियावर व्हायरल झाली.

यात, इंडिया टुडेचे नाव समोर आल्याने चर्चेत, आरोप प्रत्यारोपात भर पडली. याबाबत स्पष्टीकरण करताना, सहपोलीस आयुक्त मिलिंद भारंबे म्हणाले, टीआरपीसाठी पैसे दिल्याप्रकरणी दाखल गुन्ह्यात इंडिया टुडेचे नाव आहे. मात्र अटक आरोपी किंवा कोणत्याही साक्षीदाराने याबाबत ठोस माहिती दिलेली नाही. याउलट या प्रकरणातील आरोपी आणि साक्षीदार खासकरून रिपब्लिक टीव्ही, फक्त मराठी आणि बॉक्स सिनेमा यांचे नाव घेत आहेत. मुंबई पोलीस याचा सर्व दिशेने तपास करत असल्याचे सांगितले.