२६ जुलैच्या पुराने वाचविले पण शेवटी मृत्युने गाठलेच; आई, मुलगी आणि आजी तीघींचाही मृत्यु

    मुंबई : २६ जुलै च्या पावसात तीचे संपूर्ण घरदार पाण्यात वाहून गेले… ज्यात त्यावेळी तीला किरकाेळ दुखापत झाली. तर तब्बल १६ वर्षानंतर उर्मिला सुभाष ठाकूर(३२) हिच्यावर काळाने झडप घातली. १६ वर्षापूर्वी जुलै मध्ये काेसळणाऱ्या मुसळधार पावसात मृत उर्मिलाच्या कुटुंबाची दैना झाली हाेती आणि १६ वर्षानंतर जुलै महिन्यातच घरातील तीन सदस्यांना गमावले… असे मृत उर्मिलाचा भाऊ लल्लन तिवारी डबडबलेल्या डाेळ्यांनी सांगत हाेता. या दुर्घटनेत मृत उर्मिलाची दाेन वर्षांची चिमुरडी ख‌ुशी व तिची वयाेवृध्द आई जीजाबाई तिवारी या दाेघींचाही मृत्यु झाला.

    रविवारी मध्यरात्रीपासून काेेसळणाऱ्या मुसळधार पावसात चेंबूर येथील भारत नगरमध्ये दरड काेसळून घडलेल्या दुर्घटनेत तिवारी कुटुंबातील तीन सदस्यांचा मृत्यु झाला. या दुर्घटनेत लल्लन तिवारी व त्यांची पत्नी अनुजा तिवारी हे दाेघे थाेडक्यात बचावले.

    हातावर पाेट असलेले तिवारी कुटुंब मागील अनेक वर्षांपासून चेंबूर ये‌थे एकत्रित राहत आहे. लल्लन तिवारी हे टॅक्सी चालक आहेत, रविवारी मध्यरात्री दरड काेसळली त्यावेळी लल्लन तिवारी व त्यांची पत्नी अनुजा हे दाेघे घरी नव्हते. काही कामानिमित्त लल्लन हे बाहेर हाेते तर त्यांची पत्नी माहेरी गेली हाेती. या घटनेमुळे तिवारी कुटुंबावर दु:खाचा डाेंगर काेसळला आहे.

    १६ वर्षांनंतर नियतीचा पुन्हा घाला !

    १६ वर्षांनंतर पुन्हा एकदा आमच्या कुटुंबाला धक्का बसला आहे. १६ वर्षापूर्वी २६ जुलैच्या पावसात आमचे पूर्ण घर पूरात वाहून गेले. त्यावेळी माझी बहिण उर्मिला त्या दुर्घटेनत वाचली हाेती. त्यावेळी तीला किरकाेळ दुखापत झाली हाेती, बऱ्याच महिन्यानंतर ती त्या प्रसंगातून सावरली हाेती. पण १६ वर्षानंतर जुलै महिन्यातच मृत्युने झडप घातली, माजी दाेन वर्षाची भाची व माझी आई या दाेघींचाही मृत्यु झाला. आमचे पूर्ण कुटुंबच उध्दवस्त झाले….माझ्या डाेक्यावरच छत्र निघून गेलं… अस ओक्साबाेक्सी रडत लल्लन तिवारी सांगत हाेते.