विधानसभा अध्यक्षपदासोबतच विधानपरिषदेच्या १२ जागा रिक्त जागाचा विषय निकाली काढा : राष्ट्रवादीच्या प्रवक्त्यांची राज्यपालांना विनंती

भाजपची लोकं निर्णय घेणार, भाजपचे लोक लोकांना अटक करणार, लोकांना दंड ठोठावणार, ही लोकशाही आहे का? आम्ही बोलू तोच कायदा, आम्ही बोलू तेच होणार इतकी लोकशाहीची थट्टा होऊ शकत नाही- नवाब मलिक

    मुंबई: राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांनी विधानसभा उपाध्यक्षांना पत्र लिहून सरकारने विधानसभा अध्यक्ष पदाच्या निवडणुकीबाबत सुचवले आहे. त्याबाबत विधानसभा अध्यक्षपदाची निवडणूक घेण्याबाबत तिन्ही पक्षात एकमत आहे. मात्र विधानपरिषदेच्या १२ जागा रिक्त आहेत. तो विषयही प्रलंबित आहे. तो निकाली काढलात तर १२ आमदार महाराष्ट्रातील जनतेच्या विकासासाठी कामाला लागतील, असे सांगत राष्ट्रवादीचे प्रवक्ते नबाब मलिक यांनी राज्यपालांना विनंतीवजा आग्रह केला आहे.

    महाविकास आघाडीतील एकही पक्ष घाबरत नाही
    भयाचे वातावरण निर्माण करून लोकांवर राजकीय दबाव आणायचा, असा प्रयत्न भाजप देशभरात करत आहे. परंतु त्यांचे हे बंगाल मॉडेल फेल ठरले आहे हे त्यांनी लक्षात ठेवावे. महाराष्ट्रातही बंगाल मॉडेलला महाविकास आघाडीतील एकही पक्ष घाबरत नाही, असा इशारा राष्ट्रवादीचे प्रवक्ते नबाब मलिक यांनी भाजप नेत्यांना दिला.

    इतकी लोकशाहीची थट्टा होऊ शकत नाही
    ते म्हणाले की, भाजप ठरवणार, भाजप मागणी करणार, भाजपची लोकं निर्णय घेणार, भाजपचे लोक लोकांना अटक करणार, लोकांना दंड ठोठावणार, ही लोकशाही आहे का? आम्ही बोलू तोच कायदा, आम्ही बोलू तेच होणार इतकी लोकशाहीची थट्टा होऊ शकत नाही, अशा शब्दात नवाब मलिक केंद्रातील भाजप सरकारवर जोरदार टीका केली.