मुंबईकरांना ग्लोबल टेंडरअंतर्गत लस पुरवठ्यासाठी ८ कंपन्यांचा प्रतिसाद, कागदपत्र पूर्ततेसाठी १ जूनपर्यंत मुदतवाढ

नवीन आलेल्या कंपन्यांना काही कागदपत्रांची पूर्तता करावी लागणार असल्याने त्यांना १ जून २०२१ पर्यंत मुदतवाढ देण्यात आली आहे. या मुदतीत कागदपत्रांची पूर्तता करणे बंधनकारक आहे. तसेच आणखी कोणाला प्रस्ताव सादर करावयाचा असल्यास संपूर्ण कागदपत्रांसोबतच पूर्ण प्रस्ताव सादर करावा लागणार असल्याचे पालिकेने स्पष्ट केले आहे.

    मुंबई – मुंबईकरांचे लसीकरण करण्यासाठी मुंबई महापालिकेने मागवलेल्या एक कोटी लशींच्या ग्लोबल टेंडरला आठ पुरवठादार कंपन्यांनी प्रतिसाद दिला आहे. आठ कंपन्यांपैकी ७ पुरवठादारांमध्ये सहा कंपन्यांनी स्पुटनिक फाईव्ह व एका पुरवठादाराने स्पुटनिक लाईट तर उर्वरित एका पुरवठादाराने अस्ट्राझेनका फाईजर या लसीचा पुरवठा करण्यात स्वारस्य दाखविले आहे. पुरवठादारांना काही कागदपत्रांची पूर्तता करावी लागणार असल्याने १ जूनपर्यंत मुदतवाढ देण्यात आली असल्याची माहिती महापालिका प्रशासनाने दिली.

    मुंबईत कोविड लशींचा तुटवडा निर्माण झाल्याने मुंबई महापालिकने एक कोटी लशींसाठी ग्लोबल टेंटर काढले. लस पुरवठा करण्यासाठी प्रशासनाने जागतिक स्तरावर दिनांक १२ मे २०२१ रोजी टेंडर काढले. त्याला सोमवारी, २४ मे पर्यंत पाच पुरवठादार कंपन्यांनी स्वारस्य दाखवले. मंगळवारी, २५ मे पर्यंत शेवटची मुदत होती. शेवटच्या दिवशी आणखी तीन कंपन्यांनी प्रतिसाद दिल्याने एकूण आठ कंपन्यांनी स्वारस्य दाखवले आहे.

    नवीन आलेल्या कंपन्यांना काही कागदपत्रांची पूर्तता करावी लागणार असल्याने त्यांना १ जून २०२१ पर्यंत मुदतवाढ देण्यात आली आहे. या मुदतीत कागदपत्रांची पूर्तता करणे बंधनकारक आहे. तसेच आणखी कोणाला प्रस्ताव सादर करावयाचा असल्यास संपूर्ण कागदपत्रांसोबतच पूर्ण प्रस्ताव सादर करावा लागणार असल्याचे पालिकेने स्पष्ट केले आहे.

    लस पुरवठा करण्यास इच्छुक असलेले पुरवठादार आणि प्रत्यक्ष लस उत्पादीत करीत असलेल्या कंपन्या या दोन्हीं दरम्यान असलेले व्यावसायिक संबंध पडताळून पाहणे अत्यावश्यक आहे. त्यामुळे लस पुरवठा हा दिलेल्या मुदतीत आणि सुरळीपणे होईल, याची खात्री पटेल, तसेच नेमक्या किती दिवसात लस पुरवठा होईल, किती संख्येने लस साठा पुरवला जाईल, लसीचे दर व रक्कम अधिदान करण्याच्या अटी व शर्ती या ४ मुख्य पैलूंचा अत्यंत बारकाईने अभ्यास केला जाणार असल्याचे प्रशासनाने म्हटले आहे.

    दरम्यान सर्व पुरवठादार कंपन्यांच्या प्रस्तावांची कागदपत्रांसह पूर्ण छाननी करुन महानगरपालिका प्रशासनाकडून वाटाघाटी केल्या जात आहेत. अधिकाधिक प्रस्ताव प्राप्त होत असल्याने स्पर्धांत्मक व वाजवी पद्धतीने ही सर्व कार्यवाही पूर्ण करता येणार असल्याचे प्रशासनाने म्हटले आहे.