नालेसफाई कंत्राटदारांकडून वसुलीची जबाबदारी वाझेंकडे; आशीष शेलार यांचा गौप्यस्फोट

मुंबईत नालेसफाई करणाऱ्या कंत्राटदारांकडून पैसे वसूल करण्याची जबाबदारी सचिन वाझेंकडे होती, असा गौप्यस्फोट करून भाजप आमदार  आशिष शेलार यांनी एकच कळबळ उडवून दिली. याबाबत नालेसफाईची चौकशी झाली पाहिजे, अशी मागणीही त्यांनी केली.

  मुंबई : मुंबईत नालेसफाई करणाऱ्या कंत्राटदारांकडून पैसे वसूल करण्याची जबाबदारी सचिन वाझेंकडे होती, असा गौप्यस्फोट करून भाजप आमदार  आशिष शेलार यांनी एकच कळबळ उडवून दिली. याबाबत नालेसफाईची चौकशी झाली पाहिजे, अशी मागणीही त्यांनी केली.

  माजी गृहमंत्री अनिल देशमुख यांनी महिन्याला १०० कोटी वसुलीचे उद्दिष्ट ठेवले होते, असा आरोप मुंबईचे माजी पोलीस आयुक्त परमवीर सिंग यांनी केल्यानंतर या प्रकरणात सचिन वाझे कनेक्शन उघड झाले. त्याचप्रमाणे मुंबईत नद्या आणि मोठमोठ्या नाल्यांतील कचरा काढण्याचे कंत्राट घेणाऱ्या ठेकादारांकडून मोठी वसुली करण्याचे काम सचिन वाझेकडे होते, असा आरोप आशीष शेलार यांनी केला.

  आमदार आशीष शेलार यांच्या नेतृत्वाखाली मुंबई महापालिकेतील गटनेते प्रभाकर शिंदे, पक्षनेते विनोद मिश्रा, प्रवक्ते भालचंद्र शिरसाट यांच्यासह भाजप नगरसेवकांनी आज मुंबईतील नालेसफाईची पाहणी केली. त्यानंतर शेलार प्रसार माध्यमांशी बोलत होते.

  मान्सूनपूर्व तयारी म्हणून नालेसफाईसाठी ७० कोटी रुपये खर्च केलेल्या मुंबई महापालिकेने त्याचा हिशेब द्यावा, अशी मागणी त्यांनी केली. ते म्हणाले की प्रशासनाचा १०० टक्के नालेसफाईचा दावा साफ खोटा आहे. काही ठिकाणी तर १६० टक्के नालेसफाईचा दावा करण्यात आला होता. पण नालेसफाईचे काम लक्षात घेतले तर नाल्यात शेती आणि भाजीनिर्मिती ही पालिकेत सत्ता असणाऱ्या शिसेनेची नवी योजना आहे, असे ते उपरोधिकपणे म्हणाले. कंत्राटदार १०० टक्क्यांचा दावा करत असले तरी प्रशासन त्याचे समर्थन कसे करू शकते. सत्ताधारी शिवसेना त्याचे समर्थन कसे करू शकते, त्यांचे यात लागेबांधे आहेत का, असा प्रश्न शेलार यांनी उपस्थित केला.

  नालेसफाईचे ऑडिट दोन प्रकारांनी केले पाहिजे अशी मागणी करतानाच शेलार म्हणाले की, नालेसफाईत काढलेला गाळ गेला कुठे? यात हातसफाई झाली, पण नालेसफाई झाली नाही. दुसरे म्हणजे गुन्हेगारी पार्श्वभूमीशी संबंधित असलेल्या केसमधील कंत्राटदार नालेसफाईत आहेत. त्यांना वाचविण्याची शिवसेना भूमिका घेत आहे. सचिन वाझेंची अटक ज्या प्रकरणात झाली, त्यानंतर त्याने न्यायालयात केला आहे. ज्या ५० डिफॉल्टर काँट्रक्टरची चौकशी चालू आहे त्या प्रत्येकाकडून दोन कोटी रुपये आणून द्या, असे शिवसेनेच्या मंत्र्यांनी म्हटल्याचे त्याने त्या अर्जात म्हटले आहे. नालेसफाईचे कंत्राटदार या ५० डिफॉल्टरशी संबंधित आहेत. म्हणून जे भ्रष्टाचात आणि वसुलीत शिवसेनेशी संबंधित नालेसफाईतील कंत्राटदार आहेत, त्यांना शिवसेनेचे मंत्री वाचवतात, असा आरोप असल्याचे शेलार म्हणाले.

  काँग्रेस जर नालेसफाईबाबत समाधानी नसेल तर त्या कंत्राटात त्यांची टक्केवारी किती हे त्यांनी जाहीर करायला हवे. सगळ्या विषयात समर्थनार्थ हात वर करणार आणि बाहेर आल्यावर हात पुढे करणार, हे `हाता`चे धंदे काँग्रेसने बंद करावेत, असे शेलार म्हणाले.

  नालेसफाई न झाल्याने सगळ्याच नगरसेवकांना जनतेच्या रोषाला बळी पडावे लागणार आहे. नालेसफाई न करण्याचे पाप केलेल्या सत्ताधाऱ्यांनी संपूर्ण मुंबईकरांची जीव आणि मालमत्ता धोक्यात आणली आहे, असेही शेलार म्हणाले.

  हे सुद्धा वाचा