कोरोनाच्या संकटामुळे गणेशोत्सवावर निर्बंध; सार्वजनिक गणपतीचे ऑनलाईन दर्शन, राज्य सरकारकडून नवीन नियम!

कोरोनाच्या पार्श्वभूमीवर राज्य सरकारने सार्वजनिक गणेशोत्सवासाठी नवी नियमावली जारी केली आहे. नव्या नियमानुसार राज्यात सार्वजनिक गणपतीचे फक्त ऑनलाईन दर्शन घेता येणार आहे. यासंदर्भात आज राज्य मंत्रिमंडळाच्या बैठकीत कोरोनाविषयक आढावा घेण्यात आला. त्यावेळी मुख्यमंत्री उध्दव ठाकरे यानी सर्व पालकमंत्र्याना गणेशोत्सवाबाबतच्या निर्बंधाचे पालन करण्याबाबत सूचना दिल्या आहेत.

  मुंबई : कोरोनाच्या पार्श्वभूमीवर राज्य सरकारने सार्वजनिक गणेशोत्सवासाठी नवी नियमावली जारी केली आहे. नव्या नियमानुसार राज्यात सार्वजनिक गणपतीचे फक्त ऑनलाईन दर्शन घेता येणार आहे. यासंदर्भात आज राज्य मंत्रिमंडळाच्या बैठकीत कोरोनाविषयक आढावा घेण्यात आला. त्यावेळी मुख्यमंत्री उध्दव ठाकरे यानी सर्व पालकमंत्र्याना गणेशोत्सवाबाबतच्या निर्बंधाचे पालन करण्याबाबत सूचना दिल्या आहेत.

  नियमांचे पालन करूनच गणेशोत्सव

  सार्वजनिक गणेशोत्सवात प्रत्यक्ष मंडपात जाऊन दर्शन घेण्यावर प्रतिबंध लावण्यात आले आहेत. भाविकांना मुखदर्शनही घेता येणार नाही. कोरोना संकटामुळे यंदाही गणेशोत्सवावर निर्बंध लावण्यात आले आहेत. त्यामुळे भाविकांना कोरोनाच्या नियमांचे पालन करूनच गणेशोत्सव साजरा करावा याबाबत आजच्या आढावा बैठकीत भर देण्यात आला.

  आगमन आणि विसर्जन मिरवणुकांवर बंदी

  तसेच आगमन आणि विसर्जन मिरवणुकांवर बंदी घातली गेली आहे. गणपती आणण्यासाठी कोरोना लस घेतलेल्या दहा जणांनाच परवानगी देण्यात आली आहे. गणेशोत्सवा निमित्ताने नवी नियमावली जाहीर करण्यात आली आहे.  त्यानुसार बाप्पाच्या आगमन आणि विसर्जन मिरवणुकांवर बंदी असून घरगुती गणेशमूर्तींची आगमन मिरवणूक काढू नये. दोन डोस घेतल्यांना सहभागी होता येईल. मात्र, दहा लोकांनाच परवानगी असेल. गणपतीची मूर्ती ही घरगुती उत्‍सवासाठी दोन फूटांपेक्षा जास्‍त उंचीची नसावी. या सूचनांचे कसोशीने पालन करण्यात यावे असे निर्देश मंत्रिमंडळाच्या आढावा बैठकीत देण्यात आले आहेत. दरम्यान राज्यातील सहा जिल्हयात कोरोना रूग्णांची वाढती संख्या लक्षात घेता येत्या रविवार नंतर फेरआढावा घेवून रात्र संचारबंदी किंवा विकेंड निर्बंधाबाबत निर्णय घेतला जाण्याची शक्यता आहे अशी माहिती सुत्रांनी दिली.

  असे आहेत निर्बंध

  • सार्वजनिक गणेशमूर्तींच्‍या आगमनाच्‍यावेळी दहा पेक्षा अधिक लोक असू नये आणि सर्वांनी कोविडच्या प्रतिबंधात्मक नियमांचे पालन करावे. गर्दी टाळावी.
  • गणपतीची मूर्ती ही सार्वजनिक उत्‍सवासाठी ४ फूटापेक्षा जास्‍त उंचीची नसावी.   घरगुती गणेशोत्सवासाठीची मूर्ती शक्यतो शाडूची असावी. किंवा पारंपारिक शाडूच्या गणेशमूर्तीऐवजी घरात असलेल्या धातू/ संगमरवर अशा मूर्तींचे पूजन करावे.
  • गणेशोत्‍सव मंडळांनी भाविकांसाठी ऑनलाईन, केबल नेटवर्क, वेबसाईट, फेसबूक, समाज माध्‍यमे इत्‍यादीद्वारे दर्शनाची सुविधा उपलब्‍ध करुन द्यावी.
  • कोरोनाच्या तिसऱ्या लाटेचा धोका पाहता भाविकांना प्रत्‍यक्षदर्शन, मुखदर्शन घेण्‍यास सक्‍त मनाई आहे.
  • सार्वजनिक गणेशोत्‍सव मंडळांनी हार, फुले इत्यादीचा कमीत-कमी वापर करुन कमीत-कमी निर्माल्य तयार होईल याची खबरदारी घ्यावी, असे आवाहन करण्यात आले आहे.