मुंबई विद्यापीठाच्या तृतीय वर्ष बीएस्सी आयटी सत्र ६ परीक्षेचा निकाल जाहीर, ‘या’ संकेतस्थळाला द्यावी लागणार भेट

उन्हाळी सत्राच्या विज्ञान शाखेच्या तृतीय वर्ष बीएस्सी आयटी सत्र ६ या परीक्षेचा निकाल जाहीर करण्यात आला आहे. या परीक्षेचा निकाल ९६.५४ टक्के लागला आहे.

    मुंबई : मुंबई विद्यापीठाच्या मे २०२१ मध्ये संपन्न झालेल्या उन्हाळी सत्राच्या विज्ञान शाखेच्या तृतीय वर्ष बीएस्सी आयटी सत्र ६ या परीक्षेचा निकाल जाहीर करण्यात आला आहे. या परीक्षेचा निकाल ९६.५४ टक्के लागला आहे. या परीक्षा ऑनलाईन पद्धतीने घेण्यात आल्या होत्या. इतर पदवी परीक्षेच्या अंतिम सत्राच्या निकालाची कार्यवाही अंतिम टप्प्यात असून तेही निकाल लवकरच जाहीर केले जातील असे परीक्षा व मूल्यमापन मंडळाचे संचालक डॉ. विनोद पाटील यांनी सांगितले.

    या परीक्षेत एकूण ७ हजार ००२ विद्यार्थी यशस्वीरित्या उत्तीर्ण झाले आहेत. या परीक्षेला ९ हजार ६२७ विद्यार्थ्यांनी नोंदणी केली होती. त्यापैकी ९ हजार ६११ एवढे विद्यार्थी परीक्षेत प्रविष्ठ झाले होते. तर १६ विद्यार्थी परीक्षेला अनुपस्थित होते. तसेच या परीक्षेत २५१ विद्यार्थी हे अनुत्तीर्ण झाले आहेत. या परीक्षेचा निकाल विद्यापीठाचे संकेतस्थळ http://www.mumresults.in/ यावर प्रसिद्ध करण्यात आला आहे. उन्हाळी सत्राचे आजपर्यंत विद्यापीठाने ४१ निकाल जाहीर केले आहेत.