मुंबई महापालिका कर्मचाऱ्यांच्या निवृत्तीचे वय ५८ वरून ६० वर्ष; स्वातंत्र्यदिनी महापौरांचे आश्वासन

मुंबई महापालिकेच्या कर्मचाऱ्यांच्या महापालिकेला अधिकाधिक लाभ व्हावा आणि चांगल्या सेवा-सुविधा निर्माण व्हाव्यात, यासाठी कर्मचाऱ्यांच्या निवृत्तीचे वय ५८ वर्षांवरून ६० वर्ष करण्यात येणार असल्याचे सूतोवाच महापौर किशोरी पेडणेकर यांनी केले आहे.

मुंबई : महापालिकेच्या कर्मचाऱ्यांच्या महापालिकेला अधिकाधिक लाभ व्हावा आणि चांगल्या सेवा-सुविधा निर्माण व्हाव्यात, यासाठी कर्मचाऱ्यांच्या निवृत्तीचे वय ५८ वर्षांवरून ६० वर्ष करण्यात येणार असल्याचे सूतोवाच महापौर किशोरी पेडणेकर यांनी केले आहे. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्याकडे त्याकरिता पाठपुरावा करण्याचे आश्वासन त्यांनी दिले.

स्वातंत्र्यदिनी महापालिका मुख्यालयात महापौरांच्या हस्ते ध्वजारोहण करण्यात आले. पालिकेतील अनेक कर्मचारी आणि अधिकारी नजीकच्या काळात सेवानिवृत्त होणार आहेत. अशा अनुभवी कर्मचाऱ्यांच्या अनुभवाचा महापालिकेला लाभ व्हावा, तसेच पालिकेची आर्थिक स्थिती पाहता सेवानिवृत्तीचे वय वाढविण्याची गरज आहे असे यावेळी त्या म्हणाल्या.

महापालिकेचे सुमारे ९० हजार ते १ लाख पूर्णवेळ कर्मचारी असून त्यातील दोन हजारांहून अधिक कर्मचारी दरवर्षी निवृत्त होतात. हे सर्व कर्मचारी २००२ पूर्वी सेवेत रुजू झालेले आहेत. यामुळे त्यांना मासिक निवृत्तीवेतन द्यावे लागते. त्याचबरोबर निवृत्तीनंतर प्रत्येक कर्मचाऱ्याला सुट्ट्यांचे पैसे, ग्रॅच्युइटी तसेच इतर देणी मिळून किमान १५ ते २० लाख रुपये महापालिकेला ठराविक कालावधीत द्यावे लागतात. तेवढ्याच प्रमाणात भविष्यनिर्वाह निधी जमा करावा लागतो. त्यामुळे दरवर्षी मोठा आर्थिक बोजा येतोच, आणि पदे रिक्त होत असल्याने कामाचा ताणही वाढतो.