परतीच्या पावसाचा तडाखा, मुंबईकरांची त्रेधा; आजचा दिवस सतर्क रहा : हवामान विभागाचा इशारा

हवामान खात्याने हा परतीचा पाऊस असून उद्या कोकणात जोरदार पावसाचा अंदाज व्यक्त केला असून सावधानतेचा इशारा दिला आहे.

मुंबई : गेल्या काही दिवसांपासून गायब असणाऱ्या पावसाने शनिवारी सायंकाळी ढगांचा गडगडाट आणि विजांच्या कडकडाटासह मुंबईला झोडपून काढल्याने मुंबईकरांची तारांबळ उडाली. हवामान खात्याने हा परतीचा पाऊस असून उद्या कोकणात जोरदार पावसाचा अंदाज व्यक्त केला असून सावधानतेचा इशारा दिला आहे.

मुंबईत शनिवारी सकाळपासूनच ढगाळ वातावरण होते. मात्र सायंकाळी अचानक प्रचंड गडगडाट आणि विजांच्या कडकडाटासह जोरदार पाऊस सुरू झाला. त्यामुळे कामावरून घरी परतणाऱ्या मुंबईकरांची त्रेधा उडाली. हा पाऊस परतीचा पाऊस असल्याचे हवामान खात्याचे उपमहासंचालक डॉ. के. एस. होसाळीकर यांनी सांगितले. मध्य भारतात या परतीच्या पावसाचा जोर सुरू आहे. उद्या कोकण पट्ट्यात या परतीच्या पावसाचा जोर राहणार आहे. परवापासून या परतीच्या पावसाचा जोर कमी होईल अशी माहितीही त्यांनी दिली.