रियाच्या वडिलांची ईडीने केली कसून चौकशी, बँकेतील लॉकरची झाडाझडती

रिया, तिचे आईवडील, भाऊ यांच्यासह ६ जणांविरुद्ध मनी लॉन्ड्रिंगचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. त्याबाबत कुटुंबाची व संबंधिताची शेकडो तास चौकशी करण्यात आली आहे. तिचे वडील इंद्रजित यांना चौकशीसाठी पाचारण करण्यात आले होते.

मुंबई : अभिनेता सुशांतसिंग राजपूतच्या आर्थिक संपत्ती अनियमितता प्रकरणातील प्रमुख संशयित अभिनेत्री रिया चक्रवर्ती हिचे वडील इंद्रजित चक्रवर्ती यांच्याकडे गुरुवारी सक्तवसुली संचालनालयाने (ईडी) कसून चौकशी केली. (Riya’s father was thoroughly interrogated by the ED) वाकेोला येथील ॲक्सिस बँकेच्या शाखेत त्यांच्या व कुटूंबीयांच्या नावे असलेलया लॉकरची झाडाझडती घेण्यात आली. रात्री नऊ वाजेपर्यंत ही चौकशी सुरु होती. अधिकाऱ्यांनी त्यांच्या बँक व्यवहारासंबंधी सर्व कागदपत्रे ताब्यात घेतल्याचे सांगण्यात आले आहे.

तसेच रिया, तिचे आईवडील, भाऊ यांच्यासह ६ जणांविरुद्ध मनी लॉन्ड्रिंगचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. त्याबाबत कुटुंबाची व संबंधिताची शेकडो तास चौकशी करण्यात आली आहे. तिचे वडील इंद्रजित यांना चौकशीसाठी पाचारण करण्यात आले होते. मात्र, त्यांच्या जुहू येथील निवासस्थानी काही नागरीक आणि प्रसार माध्यमांनी गर्दी केल्याने त्यांनी सुरक्षिततेच्या दृष्टीने बाहेर पडण्यास असमर्थता दर्शविली होती. रियानेही त्याबाबत व्हिडीओ व्हायरल करीत मुंबई पोलिसांकडे संरक्षणाची मागणी केली होती.

पोलिसांकडून रियाच्या निवासस्थानी बंदोबस्त पुरविण्यात आला आहे. तसेच पोलिसांनी इंद्रजित चक्रवर्ती यांना ताब्यात घेऊन दुपारी साडेतीनच्या सुमारास सांताक्रूझच्या वाकोला येथील ॲक्सिस बँकेच्या शाखेत नेले. त्याठिकाणी ईडीचे अधिकारी आले आणि मग बँकेचे शटर आतून बंद करुन चौकशी करण्यात आली.