BMC मध्ये पाच वर्षात एक हजार कोटींचा घोटाळा; आशीष शेलारांचे ठाकरे सरकारवर टीकास्त्र

पहिल्याच पावसात मुंबईची तुंबापुरी झाल्याने भाजपाने शिवसेना आणि मुंबई महापालिकेवर जोरदार टीका केली आहे. सत्ताधीशांचा वसुलीचा नादच खुळा, नेमेची येतो पावसाळा, अशा काव्यमय शब्दात भाजप नेते आशिष शेलार यांनी शिवसेनेवर टीका केली आहे. तसेच महापालिकेत पाच वर्षात एक हजार कोटींचा घोटाळा झाल्याचा आरोपही आशिष शेलार यांनी केला आहे.

  मुंबई : पहिल्याच पावसात मुंबईची तुंबापुरी झाल्याने भाजपाने शिवसेना आणि मुंबई महापालिकेवर जोरदार टीका केली आहे. सत्ताधीशांचा वसुलीचा नादच खुळा, नेमेची येतो पावसाळा, अशा काव्यमय शब्दात भाजप नेते आशिष शेलार यांनी शिवसेनेवर टीका केली आहे. तसेच महापालिकेत पाच वर्षात एक हजार कोटींचा घोटाळा झाल्याचा आरोपही आशिष शेलार यांनी केला आहे.

  एक हजार कोटींचा घोटाळा

  आशिष शेलार यांनी पहिल्याच पावसात मुंबई तुंबल्याने महापालिका आणि शिवसेनेला घेरलं आहे. शेलार यांनी ट्विट करून पालिकेच्या भ्रष्ट कारभारावरच बोट ठेवलं आहे. मुंबईत दरवर्षीप्रमाणे पाणी तुंबले आहे. घरात पाणी घुसू लागले आहे. नालेसफाई कधी 107% तर कधी 104% झाल्याच्या दाव्यांचे आकडे मोठे-मोठ्याने वाझे. पहिल्या पावसातच कटकमिशनचे सगळे व्यवहार उघडे पडले आहेत. मुंबईकर हो! सत्ताधीशांचा हा वसुलीचा नाद खुळा, नेमेची येतो पावसाळा. पाच वर्षांत 1 हजार कोटींचा घोटाळा, अशी काव्यात्मक टीका शेलार यांनी केली आहे.

  राज्य सरकार ‘ही’ जबाबदारीही मोदींवरच ढकलेल

  मुंबई तुंबल्याने भाजपाचे आमदार अतुल भातखळकर यांनी राज्य सरकार आणि मुंबई महालिकेवर टीका केली आहे. पावसामुळे मुंबई जलमय झाली आहे. आता राज्य सरकार बहुतेक पावसाची जबाबदारी मोदींवरच ढकलतील, असा टोला अतुल भातखळकर यांनी लगावला. महापालिकेने मुंबई तुंबवून दाखवली आहे. नालेसफाईच्या कामात भ्रष्टाचार झाल्याचे आम्ही आधीपासून सांगत होतो, ते आज उघड झाले आहे, असे सांगतानाच राज्य सरकार आता बहुतेक पावसाची जबाबदारी मोदींवरच ढकलतील. मोदींनीच त्यातून मार्ग काढावा असे त्यांनी म्हणू नये एवढीच अपेक्षा आहे, असा टोला भातखळकर यांनी लगावला आहे. महापालिकेतील भ्रष्टाचार कमी करून नालेसफाई नीट करा. जे पाणी तुंबण्याचे स्पॉट आहेत. त्या ठिकाणी तात्काळ कार्यवाही करा, असा आमचा पालिका आयुक्तांना सल्ला राहील, असेही ते म्हणाले.

  लसीकरणाचे नियोजन करणार

  महापालिकेच्या आगामी निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर भाजपाची एक बैठक पार पडली. या बैठकीनंतर अतुल भातखळकर यांनी मीडियाशी संवाद साधला. पंतप्रधानांनी मोफत लसीकरणाची घोषणा केली आहे. शेवटच्या स्तरापर्यंतच्या नागरिकाला ही लस मिळावी यासाठी आमचे नियोजन सुरू आहे. त्यासाठी कँम्प लावण्यात येणार आहेत, असे त्यांनी सांगितले. कोरोनाच्या दुसऱ्या लाटेत अनेक मुले अनाथ झाली. किती मुले अनाथ झाली याचा आढावा घेण्यात आला असून त्यांना मदत देण्याबाबतही बैठकीत चर्चा झाल्याचे त्यांनी स्पष्ट केले.

  हे सुद्धा वाचा