‘नामांकीत IT कंपनी इन्फोसिस करतेय नक्षली आणि तुकडे तुकडे गॅंगला मदत’ RSS च्या मासिकाचा आरोप

इन्फोसिस कंपनीचे प्रमोटर नंदन निलेकणी यांनी काँग्रेसच्या तिकिटावर लोकसभा निवडणूक लढवली आहे. कंपनीचे संस्थापक नारायण मूर्ती हे मोदीविरोधी आहेत हे सत्य कोणापासून लपलेले नाही. इन्फोसिस अशा लोकांना उच्च पदांवर नियुक्त करते, जे एका विशिष्ट विचारधारेचे समर्थन करतात. जर अशा कंपनीला मोठ्या सरकारी निविदा मिळाल्या त्यामुळे यांच्या कामात चीन आणि ISI चा प्रभाव असल्याची भिती निर्माण होते. असं या मासिकाने म्हटलं आहे.

  राष्ट्रीय स्वयंसेवक संघाशी (RSS) संबंधित पांचजन्य या मासिकाने देशातील मोठी आयटी कंपनी इन्फोसिसवर गंभीर आरोप केले आहेत. यात त्यांनी ‘इन्फोसिस देशविरोधी संघटनांशी जोडली गेली आहे. ही कंपनी नक्षलवादी, डावे आणि तुकडे तुकडे गँगला मदत करते.’ असे म्हटले आहे. इन्फोसिस जाणूनबुजून भारतीय अर्थव्यवस्था अस्थिर करण्याचा प्रयत्न करत असल्याचा आरोप देखील या मासिकाने केला आहे.

  राष्ट्रीय स्वयंसेवक संघाशी संबंधित पांचजन्य या साप्ताहिक मासिकाने वस्तू आणि सेवा कर (GST) आणि आयकर पोर्टलमधील त्रुटींमुळे या सॉफ्टवेअर निर्मात्या कंपनीवर आरोप केला आहे.

  पांचजन्य मासिकाने त्यांच्या ‘साख और आघात’ नावाच्या लेखात म्हटले आहे की, ‘इन्फोसिसने तयार केलेल्या कर भरण्याच्या प्रणालीतील त्रुटींमुळे लोकांचा करप्रणालीवरील विश्वास कमी होत आहे. अशा वेळी यात देशविरोधी शक्तींचा काही संबंध आहे का? असा विचार येतो. कुठेतरी हे सर्व देशाच्या अर्थव्यवस्थेला हानी पोहचवण्यासाठी केले जात आहे.’

  इन्फोसिसने तयार केलेले नवीन आयकर भरण्याचे पोर्टल 7 जून रोजी ऑनलाइन झाले, परंतु तेव्हापासून करदात्यांना या वेबसाइटवर अडचणी येत आहेत. गेल्या महिन्यात अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी इन्फोसिसचे मुख्य कार्यकारी अधिकारी सलील पारेख यांना फोन करून लवकरात लवकर त्रुटी दुरुस्त करण्यास सांगितले. अर्थमंत्र्यांनी यासाठी कंपनीला 15 सप्टेंबरपर्यंत वेळ दिला.

  इन्फोसिसला 2019 मध्ये हा करार मिळाला. कंपनीचे प्रमोटर नंदन निलेकणी यांनी काँग्रेसच्या तिकिटावर लोकसभा निवडणूक लढवली आहे. कंपनीचे संस्थापक नारायण मूर्ती हे मोदीविरोधी आहेत हे सत्य कोणापासून लपलेले नाही. इन्फोसिस अशा लोकांना उच्च पदांवर नियुक्त करते, जे एका विशिष्ट विचारधारेचे समर्थन करतात. जर अशा कंपनीला मोठ्या सरकारी निविदा मिळाल्या त्यामुळे यांच्या कामात चीन आणि ISI चा प्रभाव असल्याची भिती निर्माण होते.

  लेखामध्ये असेही म्हटले आहे की, इन्फोसिस डाव्या आणि इतर अशा कंपन्यांशी दीर्घ काळापासून संबंधित असल्याच्या बातम्या आल्या आहेत. ज्या पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या विरोधात आहेत. इन्फोसिस आपल्या परदेशी ग्राहकांना देखील अशीच सेवा देते का? असा प्रश्न लेखात विचारण्यात आला आहे.