आरटीई प्रवेश लवकरच सुरू

मुंबई : कोरोनामुळे करण्यात आलेल्या लॉकडाऊनमुळे स्थगित करण्यात आलेली आरटीई प्रवेश प्रक्रियेला राबवण्यास सरकारने मान्यता दिली आहे.

 मुंबई : कोरोनामुळे करण्यात आलेल्या लॉकडाऊनमुळे स्थगित करण्यात आलेली आरटीई प्रवेश प्रक्रियेला राबवण्यास सरकारने मान्यता दिली आहे.

 
 त्यामुळे लवकरच शैक्षणिक वर्ष २०२०-२१ साठी आरटीई प्रवेश प्रक्रियेला सुरुवात होण्याची शक्यता आहे. ही प्रवेश प्रक्रिया राबवताना पालकांनी शाळा स्तरावर कागदपत्रांची प्राथमिक पडताळणी करून पडताळणी समितीच्या मान्यतेने प्रवेश प्रक्रिया पूर्ण करावेत असे आदेश शिक्षण संचालकांनी दिले आहेत.
 
बालकांचा मोफत व सक्तीच्या शिक्षणाचा अधिकार अधिनियम नुसार खाजगी विनाअनुदानित किंवा कायम विनाअनुदानित किंवा स्वयंअर्थसहाय्यता शाळांमध्ये वंचित व दुर्बल घटकातील मुलांसाठी प्रवेश स्तरावर २५ टक्के जागा राखीव ठेवण्यात येतात. २०२०-२१ शैक्षणिक वर्षासाठी १७ मार्चला आरटीईची सोडत काढण्यात आली होती. मात्र कोरोनाच्या पाश्वभूमीवर प्रवेश प्रक्रियाच बंद करण्यात आली. जाहीर झालेल्या सोडतीत राज्यभरात १ लाख ९२० विद्यार्थ्यांची निवड झाली, तर ७५ हजार ४६५ विद्यार्थ्यांची प्रतिक्षा यादी जाहीर करण्यात आली. या सर्व विद्यार्थ्यांना मेसेज पाठविण्यात आले आहेत.
 
 सद्यस्थितीत पडताळणी केंद्रावर पडताळणी समितीकडे जावून कागदपत्रांची पडताळणी करणे अडचणीचे आहे. त्यामुळे या शैक्षणिक वर्षासाठी शाळा स्तरावर पडताळणी व संकलन करून पडताळणी समितीच्या मान्यतेने प्रवेश देण्यात याव्यात अशा सूचना शिक्षण संचालकांनी दिल्या आहेत. 
 
 
प्रवेश प्रक्रिया राबवताना शाळांनी योग्य प्रकारे नियोजन करावे, अशा सूचनाही देण्यात आल्या आहेत. आरटीई पोर्टलवर शाळेला लॉगीनला विद्यार्थ्यांची यादी दिलेली आहे. यादीनुसार विद्यार्थ्याना प्रवेशासाठी कोणत्या तारखेला बोलावयचे हे शाळेने ठरवायचे आहे. तसेच गर्दी होणार नाही अशा प्रकारे शाळेने नियोजन करावे. प्रवेशाचे वेळापत्रक शाळेच्या गेटवर अथवा योग्य त्या ठिकाणी लावावे. मूळ कागदपत्रे जमा केल्यावर पालकांना अलॉटमेंट लेटरवर प्रवेश देताना त्यांच्याकडून हमीपत्र घ्यावे. 
 
 
 
प्रवेशासाठी पालकांना तीनवेळा संधी 
कोरोनामुळे काही पालक मूळ गावी किंवा अन्य जागी स्थलांतरित झाले असण्याची शक्यता आहे. त्यामुळे दिलेल्या तारखेस पालक आले नाही तर त्यांना पुन्हा पुढची तारीख देण्यात यावी. तसा मेसेज त्यांना पोर्टलवरून जाईल. परंतु दुसर्‍या तारखेलाही पालक उपस्थित न राहिल्यास तिसरी तारीख द्यावी. अशा प्रकारे पालकांना तीन वेळा संधी द्यावी. त्याचप्रमाणे सध्या शाळेने प्रतिक्षायादीतील पालकांना बोलवू नये.
 
कोरोना प्रतिबंधित क्षेत्रामध्ये सवलत
शाळा कोरोना प्रतिबंधित क्षेत्रात असल्यास किंवा शाळा कोरोनाच्या कामासाठी प्रशासनाने ताब्यात घेतली असल्यास अशा शाळांनी प्रतिबंधित क्षेत्रातील अटी शिथील झाल्यानंतर प्रवेशाबाबत कार्यवाही करावी. तसेच कोरोना प्रतिबंधित क्षेत्रातील पालकांना निर्बंध शिथिल झाल्यानंतर बोलविण्यात यावे.