राज्यातल्या राज्यात प्रवास करायचाय? आजपासून असतील हे नियम, बाहेर पडण्यापूर्वी या गोष्टी लक्षात ठेवा

राज्यात एका जिल्ह्यातून दुसऱ्या जिल्ह्यात प्रवास करता येईल का, असा प्रश्न सध्या अनेक सर्वसामान्यांना पडलाय. त्याबाबत सरकारनं काही बाबी स्पष्ट केल्यात. ज्या जिल्ह्यात कोरोना पॉझिटीव्हीटी दर हा २० टक्क्यांपेक्षा जास्त आहे आणि जिथं ७५ टक्क्यांपेक्षा अधिक ऑक्सिजन बेड भरलेले आहेत, अशा जिल्ह्यांमध्ये नागरिकांना प्रवेश मिळणार नसल्याचं सरकारच्या वतीनं स्पष्ट करण्यात आलंय. 

    राज्यात कोरोना रुग्णांची आकडेवारी कमी होत असली तरी ही घट समाधानकारक नसल्याचं सांगत राज्यातील लॉकडाऊनसदृश नियम आणखी १५ दिवस कायम ठेवण्याचा निर्णय राज्य सरकारनं घेतलाय. हे नियम कायम ठेवताना काही निर्बंध मात्र शिथिल करण्यात आले असून काही नियम आहे तसेच पुढे सुरु ठेवणार असल्याचं जाहीर करण्यात आलंय.

    राज्यात एका जिल्ह्यातून दुसऱ्या जिल्ह्यात प्रवास करता येईल का, असा प्रश्न सध्या अनेक सर्वसामान्यांना पडलाय. त्याबाबत सरकारनं काही बाबी स्पष्ट केल्यात. ज्या जिल्ह्यात कोरोना पॉझिटीव्हीटी दर हा २० टक्क्यांपेक्षा जास्त आहे आणि जिथं ७५ टक्क्यांपेक्षा अधिक ऑक्सिजन बेड भरलेले आहेत, अशा जिल्ह्यांमध्ये नागरिकांना प्रवेश मिळणार नसल्याचं सरकारच्या वतीनं स्पष्ट करण्यात आलंय.

    याशिवाय एका जिल्ह्यातून दुसऱ्या  जिल्ह्यात जाताना काही कारणांसाठीच प्रवेश मिळू शकेल. यामध्ये नात्यातील कुणाचा मृत्यू झाला असेल, काही वैद्यकीय कारण असेल किंवा इतर काही आणीबाणीचा प्रसंग असेल, तर नागरिकांना एका जिल्ह्यातून दुसऱ्या जिल्ह्यात जाता येणार आहे.

    बाहेरच्या राज्यातून महाराष्ट्रात येण्यासाठी मात्र आरटीपीसीआर टेस्ट बंधनकारक असणार आहे. यापूर्वी कोरोना संवेदनशील राज्यांमधून येणाऱ्या नागरिकांसाठी हा नियम लावण्यात येत होता. मात्र यापुढे कुठल्याही राज्यातून महाराष्ट्रात येण्यासाठी आरटीपीसीआर टेस्ट बंधनकारक असणार आहे. ही टेस्ट महाराष्ट्रात प्रवेश करण्यापूर्वी ४८ तास अगोदर केलेली असणं बंधनकारक असणार आहे.

    केवळ सर्वसामान्य प्रवाशांसोबत मालवाहतूक करणाऱ्या वाहनांच्या चालक आणि वाहकांनाही ही टेस्ट करणं बंधनकारक असणार आहे. त्यामुळे महाराष्ट्राबाहेरून राज्यात येणाऱ्या मालवाहतूकदार वाहनांची संख्या कमालीची रोडावण्याची शक्यता आहे. अनेक ठिकाणी आरटीपीसीआर टेस्टचा अहवाल यायला ४ ते ५ दिवस लागतात. त्यामुळे लॅबमधून टेस्टचा रिपोर्टच मिळत नसेल, तर ४८ तासांतला अहवाल कसा सादर करायचा, असा प्रश्न अनेक नागरिकांना सध्या पडला आहे.