सचिन वाझेंच्या कोठडीत ९ एप्रिलपर्यंत वाढ, विनायक शिंदे आणि नरेश गोर यांना न्यायालयीन कोठडी; सीबीआयने दाखल केलेला चौकशी अर्जही मंजूर

उद्योगपती मुकेश अंबानींच्या निवासस्थानाबाहेर जिलेटिन कांड्या आणि धमकीचे पत्र ठेवलेली स्कॉर्पिओ गाडी बेवारस सोडण्यात आल्याच्या तसेच त्या गाडीचे मालक मनसुख हिरेन यांच्या अनाचक मृत्यूप्रकरणी पोलीस निरीक्षक सचिन वाझे यांना एनआयएकडून अटक करण्यात आली.

  मुंबई : अंबानींच्या घराबाहेरील स्फोटकं आणि मनसुख हिरेन प्रकरणी अटक करण्यात आलेले निलंबित सहाय्यक वरिष्ठ पोलीस निरीक्षक सचिन वाझे यांच्या एनआयए कोठडीत ९ एप्रिलपर्यंत वाढ करण्यात आली आहे. तर परमबीर सिंह यांच्या आरोपाबद्दल उच्च न्यायालयाने दिलेल्या आदेशांची पूर्तता करण्यासाठी सीबीआयने दाखल केलेला अर्जही विशेष एनआयए न्यायालयाने मंजूर केला असून त्यानुसार त्यांना चौकशी करण्यासही परवानगी दिली आहे.

  उद्योगपती मुकेश अंबानींच्या निवासस्थानाबाहेर जिलेटिन कांड्या आणि धमकीचे पत्र ठेवलेली स्कॉर्पिओ गाडी बेवारस सोडण्यात आल्याच्या तसेच त्या गाडीचे मालक मनसुख हिरेन यांच्या अनाचक मृत्यूप्रकरणी पोलीस निरीक्षक सचिन वाझे यांना एनआयएकडून अटक करण्यात आली. त्यानंतर न्यायालयाने त्यांना ७ एप्रिलपर्यंत एनआयए कोठडी सुनावली होती. बुधवारी त्यांची कोठडी संपत असल्याने त्यांना न्या. प्रशांत. रा. सित्रे यांच्यासमोर हजर करण्यात आले.

  तेव्हा, त्यांच्यासोबत या प्रकणातील साथीदार विनायक शिंदे आणि बुकी नरेश गोर यांनाही हजर करण्यात आले. सचिन वाझे यांच्याकडून ३६ लाख रूपयांची रोकड हस्तगत करण्यात आली आहे. हा पैसा कठून आला, तो कशासाठी वापरायचा होता, तो खंडणीरुपाने मिळवलेला नव्हता ना? जिलेटिन कांड्या याच पैशातून खरेदी करण्यात आल्या होत्या का ? यामागे मोठा आर्थिक हेतू असल्याचेही स्पष्ट असून मग तो काय होता?, तसेच या पैशातून दहशतवादी कारवायी कऱणारे कृत्य तर आखण्यात आले नव्हते ना याबाबत चौकशी आवश्यक असल्याचा दावा एनआयएकडून अतिरिक्त सॉलिसिटर जनरल ॲड. अनिल सिंह यांनी केला. तसेच विनायक शिंदे आणि नरेश गोर यांनी चौकशी पूर्ण झाली असल्यामुळे एनआयएकडून न्यायालयीन कोठडी मागण्यात आली.

  ती ग्राह्य धरत न्यायालयाने त्यांना २१ एप्रिलपर्यंत न्यायालयीन कोठडी सुनावली. तर सचिन वाझेंना ९ एप्रिलपर्यंत एनआयए कोठडी सुनावली. तसेच यावेळी सीबीआयने दाखल केलेला अर्ज ग्राह्य धरत एनआयए कोठडीतच त्यांना चौकशी करण्याचे निर्देश दिले. मात्र, चौकशी कशी आणि कुठे करणार त्याबाबत एनआयएशी बोलून सीबीआयने वेळ निश्चित करावी असेही निर्देश दिले.

  दुसरीकडे, सचिन वाझेंना हद्यसंबंधित त्रास असून त्यांची अँजिओग्राफी होणे गरजेचे असल्याचा पुर्नउच्चार त्यांच्या वकिलांमार्फत करण्यात आला. त्यामुळे ती करण्याची अनुमती द्यावी, अशी मागणीही त्यांच्याकडून करण्यात आली. त्यावर आक्षेप घेत आम्ही वाझेंची योग्य देखभाल करत असल्याचा दावा एनआयएकडून करण्यात आला. त्यावर पुढील सुनावणीला वाझेंचा वैद्यकीय अहवाल न्यायालयात सादर कऱण्याचे निर्देश एनआयएला देत सुनावणी तहकूब करण्यात आली.

  विनायक शिंदेची मागणी फेटाळली

  सुनावणीदरम्यान, विनायक शिंदेनी विशिष्ट कारागृहाची मागणी न्यायालयाकडे केली. तेव्हा, आरोपीला कारागृह निवडण्याचा अधिकार नसून रोस्टरप्रमाणे नाव लागेल त्या ज्या कारागृहात जावे लागेल असे न्यायालयाने सांगितले. तसेच शिंदेनी भावाला भेटण्यासाठी मागितलेली परवानगीही न्यायालयाने फेटाळून लावली.