१३ तासांच्या झडतीनंतर सचिन वाझे यांना अटक; NIA ने ठोकल्या बेड्या

वाझे यांनी अटकेपासून वाचण्यासाठी शुक्रवारीच जिल्हा सत्र न्यायालय ठाणे येथे अंतरीम जामिनासाठी अर्ज दाखल केला होता. याप्रकरणी १९ मार्चला सुनावणी होणार होती. मुकेश अंबानी यांच्या घराजवळ सापडलेल्या स्फोटकांनी भरलेल्या स्कॉर्पिओचे मालक मनसुख हिरेन यांचा संशयास्पद मृत्यूनंतर पोलीस अधिकारी सचिन वाझे यांच्यावर आरोप झाल्याने या प्रकरणाला गंभीर वळण मिळाले आहे.

    मुंबई : उद्योगपती मुकेश अंबानी यांच्या घरासमोर एका स्कॉर्पिओ गाडीत स्फोटके सापडल्याप्रकरणी तब्बल १३ तासांच्या चौकशीनंतर एपीआय सचिन वाझे यांना एनआयएने अटक केली आहे. एनआयएने सांगितल्यानुसार, सचिन वाझे यांना आईपीसीच्या कलम २८६, ४६५, ४७३, ५०६(२), १२० बी आणि ४ (ए)(बी)(आय) स्फोटक वस्तू कलम १९०८ अंतर्गत अटक करण्यात आली आहे.

    वाझे यांनी अटकेपासून वाचण्यासाठी शुक्रवारीच जिल्हा सत्र न्यायालय ठाणे येथे अंतरीम जामिनासाठी अर्ज दाखल केला होता. याप्रकरणी १९ मार्चला सुनावणी होणार होती. मुकेश अंबानी यांच्या घराजवळ सापडलेल्या स्फोटकांनी भरलेल्या स्कॉर्पिओचे मालक मनसुख हिरेन यांचा संशयास्पद मृत्यूनंतर पोलीस अधिकारी सचिन वाझे यांच्यावर आरोप झाल्याने या प्रकरणाला गंभीर वळण मिळाले आहे. याच पार्श्वफभूमीवर शनिवारी (१३ मार्च) सकाळपासूनच सचिन वाझेंची एनआयएकडून चौकशी सुरू होती.

    काय आहे प्रकरण ?

    अंबानी यांच्या अँटिलिया घराबाहेर स्फोटके आणि धमकीचे पत्र असलेली स्कॉर्पिओ कार सापडल्यानंतर, या प्रकरणाचा तपास वाझे यांच्याकडे सोपविण्यात आला होता. मात्र, या स्कॉर्पिओ कारचे मालक व्यापारी मनसुख यांचा मृत्यू झाला आणि वाझे संशयाच्या भोवऱ्यात सापडले. या प्रकरणी विरोधी पक्षाने त्यांचे निलंबन करून तत्काळ अटकेची मागणी केली होती. यानंतर गृहमंत्री अनिल देशमुख यांनी हा तपास राज्य दहशतवाद विरोधी पथकाकडे (एटीएस) सोपविला होता. दहशतवाद विरोधी पथकानेही मनसुख हिरेन मृत्यू प्रकरणांत वाझे यांची तब्बल दहा तास चौकशी केली.