अंडरवर्ल्डमध्ये यांचे नाव ऐकताच भरते धडकी; कोणाची झालीये सेंच्युरी, तर अनेकजण सेंच्युरी गाठण्याच्या बेतात; या ७ एन्काउंटर स्पेशलिस्टने ४८० जणांचा केलाय खात्मा

मुंबईत १९८०-९० च्या दशकात जेव्हा अंडरवर्ल्डच्या कारवाया दिवसेंदिवस वाढत होत्या, तेव्हा पोलिसांनी काही अधिकाऱ्यांवर छोटा राजन, दाऊद आणि अन्य काही गुंडांच्या टोळीचा खात्मा करण्याची जबाबदारी सोपवली. पोलिसांनी काही गुंडांविरोधात नोटीसा जारी करून 'दिसताक्षणी गोळ्या घालण्याचे' आदेश दिले. यानंतर मुंबईत सुरू झाली एन्काउंटर्सची मालिका.

  मुंबई : ‘एन्काउंटर स्पेशलिस्ट’ म्हणून नावलैकिक असलेले सचिन वाझे सध्या अँटिलिया स्फोटक प्रकरणी अटकेत आहेत. १९९० मध्ये मुंबई पोलीस दलात भरती झालेल्या वाझे यांनी ६३ हून अधिक जणांचे एन्काउंटर केले आहेत. हायटेक अधिकारी म्हणून ख्याती असलेले वाझे यांची निरीक्षण तज्ज्ञ म्हणूनही गणना होते.

  मुंबईत १९८०-९० च्या दशकात जेव्हा अंडरवर्ल्डच्या कारवाया दिवसेंदिवस वाढत होत्या, तेव्हा पोलिसांनी काही अधिकाऱ्यांवर छोटा राजन, दाऊद आणि अन्य काही गुंडांच्या टोळीचा खात्मा करण्याची जबाबदारी सोपवली. पोलिसांनी काही गुंडांविरोधात नोटीसा जारी करून ‘दिसताक्षणी गोळ्या घालण्याचे’ आदेश दिले. यानंतर मुंबईत सुरू झाली एन्काउंटर्सची मालिका. अंडरवर्ल्डच्या दहशतीचा बिमोड करण्यासाठी मुंबई पोलिसांनी छोटा राजन आणि दाऊदच्या गँगमधील जवळजवळ ४५० हून अधिक गँगस्टर्सचा एन्काउंटर केला यात सचिन वाझे यांच्या ६३ एन्काउंटर्सचाही समावेश आहे.

  आज आम्ही तुम्हाला मुंबई पोलिसांच्या काही अशाच एन्काउंटर स्पेशलिस्टविषयी सांगणार आहोत, ज्यांचं नाव घेतलं तरी अंडरवर्ल्डमधल्या लोकांना धडकी भरत होती. या अधिकाऱ्यांवर दाऊद आणि छोटा राजन यांच्याकडून पैसे घेऊन खोटे एन्काउंटर केल्याचे आरोपही करण्यात आले आहेत. यापैकी अनेकांनी नोकरी सोडल्यानंतर राजकारणातही प्रवेश केला होता. तथापि या सर्वांवर एकही आरोप अद्याप सिद्ध झालेला नाही.

  जाणून घेऊयात या एन्काउंटर स्पेशलिस्ट विषयी :

  प्रदीप शर्मा : ११२ एन्काऊंटरचे धनी

  खास गोष्टी :

  प्रदीप शर्मा शिवसेनेत प्रवेश करण्यापूर्वी खंडणी वसुली विरोधी पथकाचे प्रमुख होते. त्यांनी अंडरवर्ल्ड डॉन दाऊद इब्राहिम याचा भाऊ इकबाल कासकर यालाही अटक केली होती. प्रदीप शर्मा यांचे अंडरवर्ल्डमध्ये मजबूत नेटवर्क आहे. शर्मा यांनी १९८३ मध्ये पोलीस दलात प्रवेश केला होता. ९० च्या दशकात त्यांचा मुंबई क्राइम ब्रँचच्या टीममध्ये सहभाग होता. ही तीच टीम होती, जिला मुंबईत अंडरवर्ल्ड संपविण्यासाठी काहीही करण्याची सवलत देण्यात आली होती.

  आरोप :

  शर्मा यांच्यावर राजन गँगचा गँगस्टर लखन भैया याचा खोटा एन्काउंटर करण्याचा आरोप लावण्यात आला होता, पण न्यायालयाने या प्रकरणात त्यांना क्लीनचीट दिली होती. याशिवाय मुंबईतील बिल्डर जर्नादन भांगे यांच्याकडून पैसे घेऊन छोटा राजनला संपविण्याचा आरोप करण्यात आला. तथापि, या प्रकरणातही त्यांना क्लीनचीट मिळाली आहे. शर्मा यांच्यावर हे आरोप लागल्यानंतर त्यांना निलंबितही करण्यात आलं होतं.

  दया नायक : ८३ एन्काऊंटरचे धनी

  खास गोष्टी :

  मुंबई पोलीस दलातील एन्काउंटर स्पेशलिस्ट दया नायक १९९५ च्या बॅचचे पोलीस अधिकारी आहेत. प्रदीप शर्मा यांच्याप्रमाणेच दया नायक यांनी मुंबईतल्या अंडरवर्ल्डचा खात्मा करण्यात महत्त्वाची भूमिका बजावली. पोलीस दलात भरती होण्याआधी दया हॉटेलात भांडी धुण्याचे काम करत होते. २०१२ मध्ये त्यांना पोलीस खात्यात ‘हत्यारी विभागा’त पोस्टिंग मिळाली. दया यांच्यावर अनेक चित्रपटही आले. आता दया नायक ATS विभागात कार्यरत आहेत.

  आरोप :

  मिळकतीपेक्षा अधिक स्थावर मालमत्ता बाळगल्याप्रकरणी ACB च्या तपासात २००६ नंतर ६ वर्षांसाठी निलंबित करण्यात आले होते. २०१० मध्ये न्यायालयाने सर्व आरोप नाकारले. दया नायक यांच्यावर दाऊदचा अत्यंत जवळचा असलेला डॉन छोटा शकील याच्यासोबत मिळून छोटा राजनला संपविण्याचा आरोप होता. यानंतर त्यांच्याविरोधात संघटित गुन्हेगारी कायदा (मोक्का) अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला होता, नंतर यातून त्यांची निर्दोष मुक्तता झाली.

  रविंद्र आंग्रे : ५४ एन्काऊंटरचे धनी

  रविंद्र आंग्रे महाराष्ट्र पोलीसमध्ये सर्वाधिक मजबूत नेटवर्क असणारे पोलीस अधिकारी होते. गँगस्टर सुरेश मंचेकरच्या संपूर्ण गँगचा खात्मा करण्यासाठी ते अनेकदा प्रकाशझोतात आले होते. ६ वर्षांपूर्वी रविंद्र यांनी रामराम ठोकत भाजपमध्ये प्रवेश केला होता. रविंद्र आंग्रे १९८३ बॅचचे अधिकारी आहेत. रविंद्र आंग्रे यांच्याकडे कोट्यावधींची मालमत्ता आहे. डोंबिवलीत दहशत माजविणाऱ्या सुरेश मंचेकर आणि त्याची गँग संपविण्याचे कामही आंग्रे यांनी केले होते.

  आरोप :

  २००८ साली ठाणे परिसरात एका बिल्डरला धमकावल्या प्रकरणी रविंद्र यांना अटक करण्यात आली होती. या प्रकरणातून निर्दोष सुटल्यानंतर त्यांची बदली नक्षलवादी विभागात करण्यात आली. त्यानंतर त्यांनी भाजपमध्ये प्रवेश केला.

  सचिन वाझे : ६३ एन्काऊंटरचे धनी

  खास गोष्टी :

  एन्काउंटर स्पेशलिस्ट प्रदीप शर्मा सचिन वाझे यांचे मार्दगर्शक होते. २००७ मध्ये वाझे यांनी पोलीस दलातील नोकरीला तिलांजली देत शिवसेनेत प्रवेश केला होता. त्यानंतर वाझे यांनी आयटी कंपनीची स्थापना केली. एका बांधकाम प्रकल्पातही त्यांनी सहभाग घेतला. १६ वर्ष निलंबित राहिल्यानंतर वाझे यांना ६ जून २०२० मध्ये मुंबई पोलीस दलात पुन्हा सामावून घेण्यात आले.

  आरोप :

  त्यांनी छोटा राजन आणि दाऊद गँगमधील अनेक गुंडांचा खात्मा केला. पोलीस उपनिरीक्षक असताना त्यांना खोटा एन्काउंटर केल्याप्रकरणी निलंबित करण्यात आलं होतं. त्यांनी आपल्या सेवा काळात ६३ एन्काउंटर केले आहेत.

  प्रफुल्ल भोसले : ७७ एन्काऊंटरचे धनी

  खास गोष्टी :

  प्रफुल्ल भोसले हे मुंबई पोलिसांच्या एन्काउंटर टीमच्या मृत्यू पथकाचे सदस्य होते. मुंबई हल्ल्यात शहीद झालेल्या विजय साळस्कर यांच्यासोबत प्रफुल्ल यांनी नायक गँग, अरुण गवळी आणि छोटा शकीलच्या अनेक गुंडांचा खात्मा केला.

  आरोप :

  ख्वाजा युनुस याचा पोलीस कोठडीत झालेल्या मृत्यूप्रकरणात प्रफुल्ल यांचेही नाव आले होते.

  विजय साळस्कर : ६१ एन्काऊंटरचे धनी

  खास गोष्टी :

  २६/११ च्या मुंबई हल्ल्यात हुतात्मा झालेले एन्काउंटर स्पेशलिस्ट विजय साळस्कर यांनी डॉन अरुण गवळी यांच्या गँगचा खात्मा केला. गँगस्टर अमर नाईक आणि सदा पावले यांना अटक केल्यानंतर यांना प्रसिद्धीचं वलय प्राप्त झालं होतं. विजय मुंबई पोलीस दलातील माजी आयुक्त राकेश मारीया यांच्या आवडत्या अधिकाऱ्यांपैकी एक होते.

  आरोप :

  एका एन्काउंटर दरम्यान एका १८ वर्षाच्या मुलाचा गोळी लागल्याने मृत्यू झाल्यानंतर ते टीकेचे धनी झाले होते.

  अस्लम मोमीन : ३० एन्काऊंटरचे धनी

  खास गोष्टी :

  राजन गँगचे मुंबईतून अस्तित्व संपविण्यात अस्लम मोमीन यांचा मोठा हात होता. अशी मान्यता आहे की, अस्लमकडे माहिती देणाऱ्यांचे सर्वात मोठे मजबूत नेटवर्क होते.

  आरोप :

  अस्लम मोमीनवर दाऊदकडून पैसे घेऊन राजन गँग संपविल्याचा आरोप होता. इंटरपोलने अस्लम आणि दाऊदचा भाऊ इब्राहिम कासकर यांच्या संभाषणाचे फोन टॅप केले होते. यानंतर अस्लमला २००५ मध्ये सेवेतून बडतर्फ करण्यात आले.