वाझेकडून मुख्यमंत्र्यांचाही विश्वासघात; एनआयएचे न्यायालयात आरोपपत्र

सहाय्यक पोलिस आयुक्तांच्या जबाबातून ही बाब स्पष्ट झाली आहे. एनआयएने न्यायालयात आरोपपत्र सादर केले आहे. त्यात सहायक पोलिस आयुक्तांचा जबाब आहे. या प्रकरणात कोणताही दहशतवादी अँगल नाही, हिरेनचा मृत्यू ही आत्महत्याच आहे, हे मुख्यमंत्र्यांच्या बैठकीत वाझे पटवून सांगत होता. तसेच तपास आपल्याकडेच सोपवावा, अशीही त्याची मागणी होती, असे या जबाबात म्हटले आहे.

  मुंबई : अँटिलिया स्फोटक कार प्रकरणात धक्कादायक माहिती पुढे आली आहे. यातील प्रमुख संशयित बडतर्फ पोलिस अधिकारी सचिन वाझे याने मोठा बनाव रचला होता. वाझे याने रचलेल्या कटाचे अखेर बिंग फुटले आहे. विशेष म्हणजे, वाझे याने मुख्यमंत्र्यांचाही विश्वासघात केल्याचे उघड झाले आहे.

  सहाय्यक पोलिस आयुक्तांच्या जबाबातून ही बाब स्पष्ट झाली आहे. एनआयएने न्यायालयात आरोपपत्र सादर केले आहे. त्यात सहायक पोलिस आयुक्तांचा जबाब आहे. या प्रकरणात कोणताही दहशतवादी अँगल नाही, हिरेनचा मृत्यू ही आत्महत्याच आहे, हे मुख्यमंत्र्यांच्या बैठकीत वाझे पटवून सांगत होता. तसेच तपास आपल्याकडेच सोपवावा, अशीही त्याची मागणी होती, असे या जबाबात म्हटले आहे.

  असा रचला कट, अखेर फुटले बिंग

  ही बैठक मुख्यमंत्री यांच्या वर्षा निवासस्थानी व्हीआयपीरूममध्ये पार पडली होती. वाझे आपले नाव मोठे व्हावे प्रसिद्धी मिळावी आणि त्यातून बढती मिळावी, या हेतूने त्याने जिलेटीनच्या कांड्या ठेऊन गाडी मुकेश अंबानी यांच्या घराजवळ ठेवली होती. या प्रकरणाचा तपास स्वतः करून त्यातून प्रसिद्धी मिळवायची आणि बढती आणि बक्षिसी मिळवायची होती, पण केलेला प्लान बिघडत गेला. गाडीचा मालक मनसुख हिरेन पुढे आल्यामुळे आपले बिंग फुटू नये, यासाठी त्याने हिरेन याची हत्या केली. या कामी त्याने आपल्या गुरूची म्हणजे प्रदीप शर्माची साथ घेतली आणि पोलिस निरीक्षक सुनील माने यांच्या मदतीने त्याचा काटा काढला. या कामाकरिता प्रदीप शर्मा याला पैसे देण्यात आले असल्याचे ही आरोप पत्रात म्हटले आहे.

  खासगी रूग्णालयात दाखल होण्याची परवानगी

  सचिन वाझेला पुढील वैद्यकीय उपचारांसाठी मुंबईतील खासगी रूग्णालयात दाखल होण्याची परवानगी गुरूवारी विशेष न्यायालयाने दिली. वाझेसाठी हा एक दिलासाच म्हणावा लागेल. कोर्टाने वाझे याला मुंबईच्या वोकहार्ट रूग्णालयात सशर्त उपचार घेण्याची परवानगी दिली आहे. यादरम्यान त्यांच्या पत्नीलाही रूग्णालयात त्यांच्यासोबत उपस्थित राहण्याची मुभा कोर्टाने दिली आहे.