दिल्लीहून एनआयएचे तीन बडे अधिकारी मुंबईत; चौकशीत वाझेंनी दिली धक्कादायक कबुली?

एनआयएच्या तपासामुळे काही तासांतच अंबानी स्फोटक प्रकरणात महत्त्वाचे पुरावे समोर आले आहेत. या कटात वापरल्या गेलेल्या स्कॉर्पिओ आणि इनोव्हा या दोन्ही गाड्यांच्या चालकांची ओळख पटली आहे. वाझे यांनीच ही माहिती एनआयएला दिल्याचे समजते. त्यामुळे एनआयए लवकरच त्या दोन्ही चालकांना ताब्यात घेऊन त्यांची चौकशी करेल.

    मुंबई : प्रसिद्ध उद्योगपती मुकेश अंबानी यांच्या घरासमोरील गाडीत स्फोटके सापडल्याच्या प्रकरणात अटक करण्यात आलेल्या सचिन वाझे यांनी मुंबई पोलिस दलातील उच्चपदस्थ अधिकाऱ्याचाही यात सहभाग असल्याची कबुली दिल्याचे खात्रीलायक वृत्त आहे. या पार्श्वभूमीवर त्या उच्चपदस्थ अधिकाऱ्याच्या चौकशीसाठी एनआयएचे उप महानिरीक्षक दर्जाचे तीन अधिकारी सोमवारी दिल्लीहून मुंबईत दाखल झाल्याची माहिती सूत्रांनी दिली.

    एनआयएच्या टीमने सोमवारी वाझे यांच्या घरावर धाड टाकली. ठाण्यातील साकेत कॉम्पलेक्स येथे वाझेंचे घर आहे. या धाडसत्रात एनआयएच्या हाती महत्त्वाचे पुरावे लागल्याची माहिती सूत्रांनी दिली.

    एनआयएच्या तपासामुळे काही तासांतच अंबानी स्फोटक प्रकरणात महत्त्वाचे पुरावे समोर आले आहेत. या कटात वापरल्या गेलेल्या स्कॉर्पिओ आणि इनोव्हा या दोन्ही गाड्यांच्या चालकांची ओळख पटली आहे. वाझे यांनीच ही माहिती एनआयएला दिल्याचे समजते. त्यामुळे एनआयए लवकरच त्या दोन्ही चालकांना ताब्यात घेऊन त्यांची चौकशी करेल.

    दोन्ही गाड्यांना बनावट नंबर प्लेट वापरण्यात आल्या होत्या. ज्या व्यक्तीने या नंबर प्लेट तयार करून दिल्या ती व्यक्तीदेखील एनआयएच्या हाती लागली आहे. ठाण्यातून या व्यक्तीला ताब्यात घेतले असून चौकशी सुरू आहे. तसेच गाडीवर पोलिस लिहिणाऱ्याचादेखील जबाब नोंदवला गेला आहे.