मला बळीचा बकरा बनवलं जात आहे,सचिन वाझेंचा एनआयए न्यायालयात दावा – ३ एप्रिलपर्यंत मिळाली एनआयए कोठडी

सचिन वाझे हे तपासात सहकार्य करत नसल्याची तक्रार देखील एनआयएने न्यायालयाकडे केली आहे. तसेच, हे गंभीर प्रकरण असून सखोल चौकशी होणे गरजेचे आहे असे देखील न्यायालयात सांगण्यात आले.

    मुंबई : उद्योगपती मुकेश अंबानी यांच्या अँटिलिया या घरासमोर सापडलेल्या स्फोटक प्रकरणात नवनवीन आणि धक्कादायक खुलासे होताना दिसत आहेत. सचिन वाझे हे तपासात सहकार्य करत नसल्याची तक्रार देखील एनआयएने न्यायालयाकडे केली आहे. तसेच, हे गंभीर प्रकरण असून सखोल चौकशी होणे गरजेचे आहे असे देखील न्यायालयात सांगण्यात आले.

    अंबानी घराबाहेरील स्फोटकं आणि मनसूख हिरेन प्रकरणात आपल्याला बळीचा बकरा बनवलं जात असल्याचा दावा निलंबित गुन्हे शाखेचे सहायक वरिष्ठ पोलीस निरीक्षक सचिन वाझे यांनी गुरुवारी एनआयए विशेष सत्र न्यायालयात केला. तसेच आपल्याला न्यायालयाला काही गोष्टी सांगायच्या असल्याचेही वाझे यांनी न्यायालयाला सांगतिले. त्याबाबत तुम्ही आपली बाजू लेखी स्वरूपात मांडा, असे निर्देश देत न्यायालयाने वाझे यांना दिले आणि त्यांना ३ एप्रिलपर्यंत एनआयए कोठडी सुनावली.

    उद्योगपती मुकेश अंबानी यांच्या अँटिलिया निवासस्थानाबाहेर जिलेटिनच्या कांड्या आणि धमकीचे पत्र ठेवलेली स्कॉर्पिओ गाडी बेवारस सोडण्यात आल्याच्या तसेच त्या गाडीचे मालक मनसूख हिरेन यांच्या अनाचक मृत्यूप्रकरणी पोलीस निरीक्षक सचिन वाझे यांना एनआयएकडून अटक करण्यात आली त्यानंतर न्यायालयाने त्यांना २५ मार्चपर्यंत एनआयए कोठडी सुनावली होती. गुरूवारी सचिन वाझे यांची कोठडी संपत असल्याने त्यांना न्या. प्रशांत. रा. सित्रे यांच्यासमोर हजर करण्यात आले.

    यावेळी वाझे यांनी केलेला गुन्हा देशपातळीवरील मोठा गुन्हा आहे. पोलीस अधिकाऱ्याचा अशाप्रकारच्या गुन्हात सहभाग असणं ही शरमेची बाब असल्याचा दावा एनआयच्या वतीने अतिरिक्त सॉलिसिटर जनरल अनिल सिंह यांनी केला. तसेच वाझे यांना अटक केल्यापासून तपास आणि चौकशीने वेग पकडला आहे. वाझे यांच्यावर युएपीए कायद्यातंर्गत गुन्हा दाखल करण्यात आला असून त्यानुषंगानेही आमचा तपास सुरु असल्याचा युक्तिवाद सिंह यांनी केला. त्यामुळे प्रथमदर्शनी पुरावे आणि माहितीच्या आधारे वाझे यांना १५ दिवासांची कोठडी देण्यात यावी, अशी मागणीही सिंह यांनी न्यायालयाकडे केली.

    त्यास वाझे यांच्याकडून तीव्र आक्षेप नोंदविण्यात आला. फक्त जिलेटिन कांड्याच्या आधारावर वाझे यांच्यावर युएपीए कायद्यांर्तगत गुन्हा दाखल होऊ शकत नाही. त्यांचा हेतू देशातील एकता आणि संरक्षण भंग करण्याचा नव्हता. त्यामुळे वाझे यांना युएपीए कायद्यांतर्गत कोठडी देता येणार नाही, असा युक्तिवाद सचिन वाझेंच्या वतीने वकिल आबाद पौंडा यांनी केला.

    जिवंत काडतुसे कशासाठी वापरली ?

    वाझे यांच्याकडे ६२ जिंवत काडतुस सापडली आहेत. त्याचा वापर कशासाठी करण्यात आला. त्याबाबत चौकशी होणे गरजेचे आहे. हॉटेलमध्ये जाताना वाझेंनी बोगस आधार कार्डचा वापर केला होता. जिलेटिन कांड्या असलेली गाडीचे गूढ अद्याप कायम आहे. तसेच तज्ज्ञांकडून आलेल्या अहवालात गाडीत स्फोटकं असल्याचे म्हटले आहे. अंबानी यांना देण्यात आलेल्या धमकी पत्राचीही चौकशी सुरू असल्यामुळे वाझे यांची युएपीए कायद्यांतर्गत चौकशी गरजेचे असल्याचा दावा सिंह यांनी केला.

    दुसरीकडे, सुनावणीदरम्यान सचिन वाझे यांनी न्यायालयासमोर आपली बाजू मांडली. आपण या प्रकरणाचा दीड दिवस तपास अधिकारी म्हणून काम केले आणि अचानक १३ मार्चला रात्री माझ्याविरोधात पुरावे आहेत, असे सांगून अटक करण्यात आली. या प्रकरणात जी चौकशी करायची होती ती झाली आहे, आता आणखीन पोलीस कोठडी देऊ नका, मी कुठल्याही गुन्ह्याची कबूली दिलेली नाही, असा दावा वाझेंनी एनआयए न्यायालयात केला.