Sadhvi Pragya Singh Thakur not heard in Malegaon blast case in special NIA court

मुंबई :  मालेगाव ब्लास्ट प्रकरणी(Malegaon blast case ) मुंबई सत्र न्यायालयातील विशेष एनआयए कोर्टात(special NIA court) गुरूवारी सुनावणी पार पडली. या खटल्यातील आरोपी साध्वी प्रज्ञासिंह ठाकूर(Sadhvi Pragya Singh) यादेखील गैरहजर होत्या.  येत्या १९ डिसेंबरला सातही आरोपींना कोर्टापुढे हजर राहण्याचे निर्देश कोर्टाने दिले आहेत. साध्वी प्रज्ञासिंह ठाकूर यांनी न्यायालयाला गैरहजर राहण्यामागचे कारण सांगीतले आहे.

मालेगावात बॉम्बस्फोट (Malegaon Blast) प्रकरण खटल्याची नियमित सुनावणी गुरूवार, ३ डिसेंबरपासून सुरु झाली आहे. मात्र, पहिल्याच दिवशी सातपैकी केवळ तीन आरोपी कोर्टासमोर हजर झाले. त्यामुळे कोर्टाची कार्यवाही पुढे सरकली नाही. गुरुवारी झालेल्या सुनावणीला आरोपी लेफ्टनंट कर्नल प्रसाद पुरेहीत, अजय राहिरकर आणि समीर कुलकर्णी हे तिघे कोर्टासमोर हजर झाले.

मात्र, या खटल्यातील आरोपी साध्वी प्रज्ञासिंह ठाकूर यांच्यावतीनं कोरोनाच्या पार्श्वभूमीवर त्या तातडीने हजर होऊ शकणार नाहीत, असं कोर्टाला वकिलांतर्फे कळवले आहे.  अनलॉक नंतर राज्यभरातील सर्व कनिष्ट कोर्टांचं नियमित कामकाज आता सुरु झालेलं आहे. त्यामुळे या प्रलंबित खटल्यातील सुनावणींचा वेग वाढवण्याचा निर्णय विशेष एनआयए कोर्टानं घेतला आहे.

डिसेंबर २०२० पर्यंत हा खटला निकाली काढला जाईल, असं आश्वासन गेल्यावर्षी एनआयएनं मुंबई हायकोर्टात दिलं होतं. मात्र, लॉकडाऊनपूर्वीच्या सहा महिन्यांत या खटल्यातील केवळ १४ जणांचीच साक्ष नोंदवण्यात आली आहे. या खटल्यात एकूण ४७५ साक्षीदार आहेत. ज्यातील ३०० हून अधिक साक्षीदारांची साक्ष अद्याप बाकी आहे.

काय आहे मालेगाव ब्लास्ट प्रकरण

२९ सप्टेंबर २००८ रोजी मालेगाव येथे एका मशिदीत बॉम्बस्फोट झाले होते. यात ७ जणांचा मृत्यू झाला होता. याप्रकरणी लेफ्टनंट कर्नल प्रसाद पुरोहित, प्रज्ञासिंह ठाकूर यांच्यासह रमेश उपाध्याय, समीर कुलकर्णी, सुधाकर चतुर्वेदी, सुधाकर द्विवेदी, अजय राहिरकर आणि संदीप डांगे यांना अटक झाली होती. एनआयए विशेष कोर्टात सुनावणी सुरु आहे.

या खटल्याची सुनावणी जलदगतीनं घेण्याचे निर्देश हायकोर्टानं याआधीच एनआयए कोर्टाला दिले आहेत. मात्र, खटल्याच्या सुनावणीला काही वकील हजरच राहत नाहीत. या खटल्याला जाणून बुजून विलंब केला जात आहे, असा आरोप या बॉम्बस्फोट प्रकरणातील संशयित आरोपी समीर कुलकर्णी यानी केला आहे. मालेगाव बॉम्बस्फोट प्रकरणाचा खटला एनआयए कोर्टानं लवकरात लवकर निकाली काढावा, अशी मागणी करत सध्या जामिनावर असलेले आरोपी समीर कुलकर्णी यांनी हायकोर्टात केला होती.